Maharashtra Political Crisis: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात मागील साडेतीन वर्षांत तिसरा महाभूकंप झाला. यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारांना परत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. यावरून आता दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी यावर भाष्य केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आणि प्रतोद म्हणून नियुक्ती केलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने आता काँग्रेस हा महाविकास आघाडीमधील मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात येत आहे. ज्या पक्षाचे अधिक सदस्य त्यांचा विरोधी पक्षनेता व्हायला पाहिजे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
महाविकास आघाडीच्या एकत्रेसाठी उभे राहू
विरोधी पक्षनेता हा संख्येवरून ठरवला जातो. सध्यातरी आमची संख्या जास्त आहे. उद्या काय होते, ते पाहूया. संख्या कमी असली, तरी आम्हाला विरोधी पक्षनेतेपद द्या, यासाठी आम्ही आग्रही नाही. इतके अपरिपक्व वागणे राष्ट्रवादी करणार नाही. राष्ट्रवादीला महाविकास आघाडी एकत्र ठेवायची आहे. त्यामुळे आमचा बळी गेला तरी चालेल. पण, महाविकास आघाडीच्या एकत्रेसाठी उभे राहू, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील. आमची संख्या ९ जणांनी कमी झाली आहे, कारण ते गेलेल आहेत. उरलेले आमदार राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत. आम्हाला काँग्रेस पक्षाशी वाद करायचा नाही. आम्ही बसून निर्णय घेऊ. आमची संख्या कमी असेल तर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो, यासाठी काही दिवसांचा कालावधी जाऊ शकतो, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.