मुंबई: गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्याची संधी सोडताना दिसत नाहीत. कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. रेमडेसिवीर, ऑक्सिजन, बेड्स यांची कमतरता जाणवत आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले असून, महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह (amit shah) म्हणजे ब्रह्मदेव नाहीत, असा जोरदार पलटवार करण्यात आला आहे. (jitendra awhad criticised amit shah over maha vikas aghadi govt statement)
राज्याचे गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी कुंभमेळ्यात तुमच्याप्रमाणे अंघोळ करून कोरोनाचा संसर्ग फैलावण्यास मदत केली नाही. आता केवळ कुंभमेळ्यात अंघोळ न केल्यामुळे आम्हाला अपवित्र ठरवले जात असेल तर आम्हाला ते चालेल, असा चिमटा आव्हाडांनी शाह यांच्या वक्तव्यावर काढला.
देशात नवा मोदी अॅक्ट आलाय की काय? नवाब मलिकांचा भाजपवर पलटवार
अमित शाह म्हणजे ब्रह्मदेव नाहीत
महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह म्हणजे काही ब्रह्मदेव नाहीत. काश्मीरमध्ये तुम्ही मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती केली. तेव्हा तुम्ही कुठल्या पवित्र संबंधात जोडले गेले होता, अशी विचारणाही आव्हाड यांनी यावेळी केली. महाराष्ट्राचा गळा दाबण्याचे काम करून महाविकास आघाडीला अपवित्र म्हणण्यापेक्षा इथली माणसे मारणार नाही, याची काळजी घ्या, या शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी अमित शाह यांना सुनावले आहे.
“माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे मोठं दुर्दैव”
दुपटीने नको, गरज आहे तेवढी तरी द्या
आपण बोलण्यापेक्षा महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा जो जबरदस्तीने कमी केला आहे, तो व्यवस्थित करा. तसेच महाराष्ट्र्राला रेमडेसिवीर देण्याबाबत जे राजकारण केले गेले आहे, ते जरा बंद करा. कमी लोकसंख्या असणाऱ्या गुजरातला व्हेंटिलेटर दिले. आम्हाला दुपटीने देऊ नका. मात्र गरज आहे तेवढी तरी द्या, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
नियम, कायद्याच्या वर कोणीही नाही; तन्मयच्या कोरोना लसीवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
दरम्यान, ठाकरे सरकार किती दिवस चालेल, असा प्रश्न अमित शाह यांना विचारण्यात आला होता. त्यावर शाह यांनी थेट उत्तर दिले. शिवसेनेने आमच्यासोबत निवडणूक लढवली होती. शिवसेना हा आमचा छोटा मित्र पक्ष होता. त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याची मोकळीक दिली होती. हे सरकार त्यांच्या ओझ्यानेच कोसळेल, असा आमचा विश्वास आहे. आम्हाला काहीही करावे लागणार नाही, असे सूचक उत्तर अमित शाह यांनी दिले.