राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श होते. तर, तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल बोलत होते. यावेळी भाषण करताना राज्यपालांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली. यानंतर याता अनेकांनी यावरून जोरदार निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील आक्रमक झाले आहेत. "हे 'भाज्यपाल' मराठी माणसाच्या राशीला नकोत, बस झाले आता..." असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. "थोड्या दिवसांपूर्वी स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होत की हे भाज्यपाल मराठी माणसाच्या राशीला नकोत! महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाईट बोलले गेले. पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे आदर्श आहेत अशा महाराजांबद्दल त्यांना जुने आदर्श म्हणून हिणवले. बस झाले आता बोचंक गुंडाळ!" असं ट्विट आव्हाडांनी केलं आहे.
"शिवाजी महाराज तर जुन्या युगातील"
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी "आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असं वाटतं तुम्हाला कोणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. मी आधुनिक युगाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील" असे म्हटले आहे. कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये शैक्षणिक कामात प्रगती नसतांना येथे लक्ष घातले आणि मिलिंदच्या माध्यमातून शिक्षण दिले. महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे हे विद्यापीठ आहे. याच्या निर्मितीपासूनचा कालखंड मला आठवतो. याच्या जडणघडणीत माझा समावेश होता याचा आनंद आहे. आज विद्यापीठाने डिलीट पदवी प्रदान केली यासाठी अंतकरणापासून आभारी आहे. नितीन गडकरी आणि माझ्या कामाची दखल घेतली गेली यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो. या विद्यापीठाच्या स्थापनेत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा वाटा आहे. या भागात विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय नेतृत्वाने घेऊन संपूर्ण मराठवाड्याच्या शिक्षणाचे दालन खुले झाले. विद्यापीठासाठी संघर्ष झाला. याचा भागात आणखी एक विद्यापीठ स्थानक करण्याच्या प्रक्रियेत माझा सहभाग होता याचा आनंद आहे. यामुळे येथे शैक्षणिक दालन खुले झाले, या शब्दांत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"