दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटात अक्षय कुमारछत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो आहे. अक्षयने या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला. सोबत शूटींग सुरू झाल्याचीही माहिती दिली. पण यामधील एक महत्त्वाची चूक काही नेटिझन्सनी लक्षात आणून दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावात चालणाऱ्या अक्षय कुमारच्या मागे बल्बचं झुंबर दिसत आहे. 'छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 ते 1680 या काळात साम्राज्य केलं. थॉमस एडिसनने 1880 मध्ये बल्बचा शोध लावला, मग हे कसं काय?' असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. आव्हाडांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र, त्याच्यामागे लावलेल्या झुंबराला बल्ब लावल्याचं दिसून येत आहे. त्यावरूनच खोचक टोला लगावला आहे. "बल्बचा शोध कधी लागला, काय थट्टा लावलीय... मराठी माणसाला येड्यात काढता आहेत" असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाविरोधात जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आज ट्विट करत त्यांनी निशाणा साधला आहे. जर्मनी,पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय... ‘वेडात मराठे वीर दौडले सात’. त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला "वेड्यात" काढलं जातयं असं वाटत असल्याची टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.
'वेडात मराठी वीर दौडले सात' हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘मला ही भूमिका राज ठाकरेंमुळे मिळाली. तू ही भूमिका करायला हवी, असं मला राज ठाकरे म्हणाले. छत्रपती महाराजांची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या भूमिकेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. सगळी शक्ती मी यासाठी खर्च करेन,’असं अक्षय कुमार म्हणाला होता. या चित्रपटात दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"