मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात पराभवाचा झटका बसल्यानंतर महायुतीलमधील सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी उमेदवारांची चाचपणी, बैठका आणि मेळावे सुरु केले आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आणि आमदारांची बैठक काल मुंबईत पार पडली.
अजित पवारांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर नेते हजर होते. या बैठकीत राष्ट्रवादी विधानसभा निवडणूक महायुतीतूनच लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीचे जागावाटप लवकरच होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादी जवळपास ८५ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा दावा अजित पवार यांच्याकडून करण्यात आल्याचे सुत्रांकडून समजते.
याचबरोबर, या बैठकीत अजित पवार यांनी थेट निवडणुकीच्या तयारीला लागा, मित्र पक्षांसोबत वादग्रस्त विधान टाळा, असे सर्व आमदार आणि पक्षाचे प्रवक्ते यांना सांगितले आहे. याशिवाय, शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा. लाडली बहीण, बसमध्ये महिला अर्ध्या दारात तिकीट तसेच इतर लोक कल्याणकारी योजना जनतेसाठी महायुतीच्या सरकारने सुरु केल्या आहे. त्या योजनांचा प्रचार आणि प्रसार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जनतेमध्ये करावा, असे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष किती जागा लढवणार, यावरून रस्सीखेच सुरु आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे काही नेते जागा वाटपाबाबत विविध दावे करत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पक्ष ८० जागा लढवणार असल्याचे सांगितले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या कालच्या बैठकीत विधानसभेच्या ८५ जागा लढवण्याचा निर्णय झाला असला तरी आता महायुतीतील भाजप आणि शिवसेना याबाबत काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.