Maharashtra Politics: “ST महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यास आता कुणी अडवलंय”; अजित पवारांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 06:01 PM2022-12-10T18:01:23+5:302022-12-10T18:02:12+5:30
Maharashtra News: जाणत्या व्यक्तीच्या घरावर हल्ला करता. केलेली कारवाई मागे घेता. या राज्यात चाललेय काय, असा संतप्त विचारणा अजित पवारांनी केली.
Maharashtra Politics: महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्नी राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका करताना पाहायला मिळत आहेत. याशिवाय, भाजप नेत्यांकडून होत असलेली विधाने, एसटी महामंडळाचे विलिनीकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न यांवरूनही विद्यमान सरकारवर निशाणा साधला जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एसटी महामंडळाच्या विलिनीकरणावरून सरकारवर टीका केली आहे.
मी सतत ओला दुष्काळासाठी भांडत होतो. शेतीमालाला हमीभाव दिला गेला पाहिजे. बेरोजगारांकडे लक्ष दिले गेले पाहिजे. पण, असे काही होताना दिसून येत नाही. जातिवादी लोकांना बाजूला ठेवता येईल. यासाठी प्रयत्न करा. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारवर हल्लाबोल केला.
सीमावादावरील बोटचेपी भूमिका घेत आहेत
शिंदे-फडणवीस सरकार सीमावादावरील बोटचेपी भूमिका घेत आहेत. एक इंचही जागा देणार नाही, असे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगा. खमकेपणाने काम करावे लागते. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत, अक्कलकोटवर दावा केला. त्यांना तुम्ही हे कदापि होणार नाही, असे ठणकावून सांगा. तुम्ही बोलतच नाही. तुम्ही म्हणजे सरकार, राज्यकर्ते आहात ना, या शब्दांत अजित पवारांनी टीकास्त्र सोडले. तसेच राज्यात बेताल वक्तव्य करणाऱ्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.पण, त्यांना आवरले जात नाही. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.
दरम्यान, एसटी महामंडळ सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी आता यांना कुणाला अडविलं आहे, डंके की चोट पे करुंगा, म्हणणारे आता शांत का, अशी विचारणा अजित पवार यांनी केली. शरद पवारांनी कधी कुणाचे घोडे मारले नाही. जुन्या जाणत्या व्यक्तीच्या घरावर हल्ला करता. घेतलेली अॅक्शन मागे घेता. या राज्यात चाललेय काय, असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"