Maharashtra Politics: “तात्या कधी येताय, वाट पाहतोय”; अजितदादांची NCPत येण्याची खुली ऑफर; वसंत मोरेंचा दुजोरा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 09:51 PM2022-12-04T21:51:08+5:302022-12-04T21:52:42+5:30
Maharashtra News: मनसेत नाराज असलेले कट्टर राज ठाकरे समर्थक वसंत मोरे यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात विविध विषयांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेत दोन गट पडले असून, शिंदे गटाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ शिवसेना नाही तर महाविकास आघाडीसह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्तेही शिंदे गटात सामील होत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याचा थेट प्रस्ताव दिला आहे.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्यासंदर्भात भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी त्याला विरोध केला होता.राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेले वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी आमदार निलेश लंके यांची भेट झाली होती. वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेसनेही यापूर्वी पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते.
तात्या कधी येताय, वाट पाहतोय
यातच अजित पवार यांनी वसंत मोरे यांना थेट प्रस्ताव दिल्याने वसंत मोरे पक्ष प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. एका विवाह सोहळ्यासाठी वसंत मोरे आणि अजित पवार उपस्थित होते. या दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केल्यानंतर ‘तात्या, कधी येताय, वाट पहातो,’ अशी विचारणा अजित पवार यांनी केली. अजित पवार यांनी जाहीर नियमंत्रण दिल्याला वसंत मोरे यांनी दुजोरा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अशी विचारणा करतात, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तसेच माझ्या कार्याचीही पावती आहे. मात्र मनसे सोडण्याबाबत विचार केलेला नाही, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वसंत मोरे यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. शहर मनसेमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचे दिसत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"