नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता कोण? अजित पवारांनी कुणाचे नाव घेतले? कौतुक करत स्पष्टच बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 02:29 PM2023-04-22T14:29:19+5:302023-04-22T14:31:02+5:30
Ajit Pawar News: अटल बिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांना जमले नाही, ते नरेंद्र मोदींनी करून दाखवले, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
Ajit Pawar News:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असून, पक्ष सोडण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. यातच आता अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावरूनही आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधारण आले आहे. एका मुलाखतीत बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी अजित पवार यांना नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण असेल, याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
आगामी २०२४ च्या निवडणुकीनंतर काय, आता म्हटले तरी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे. १०० टक्के मुख्यमंत्री होण्यास मला आवडेल. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. या दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता. ठाकरे यांच्यासोबत आनंदाने, समाधानाने काम केले. पण, चव्हाण यांच्यासोबत नाईलाजाने आणि वरिष्ठांनी सांगितल्यामुळे काम केले, असा खुलासा अजित पवार यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण, या प्रश्नाला अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.
नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता कोण? अजित पवार स्पष्टच बोलले!
भाजप २०१४ आणि २०१९ मध्ये सर्वदूर पोहोचली. याला एकमेव कारण नरेंद्र मोदी आहेत. नरेंद्र मोदींचा करिश्मा देशात चालला. त्यांनी देशात तसा विश्वास संपादन करत किंवा आपल्या भाषणातून जनतेला आपलेसे करण्याचे काम मोदींनी केले आहे, असे सांगत १९८४ नंतर पहिल्यांदा देशात २०१४ साली बहुमत असलेलं सरकार अस्तित्वात आले. काँग्रेसच्या सरकारमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागली. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आपला करिश्मा निर्माण केला, हे नाकारता येणार नाही. मात्र, आज नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण? असा प्रश्न विचारला, तर कोणतेही नाव समोर येत नाही, या शब्दांत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमने उधळली.
बहुमत मिळवून देण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले
भाजपकडे अटल बिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे नेतृत्व होते. तरीही त्यांना जे जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करून दाखवले. भाजपला पूर्ण बहुमत कधीच मिळाले नव्हते. ते बहुमत मिळवून देण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले, असेही अजित पवार यांनी नमूद केले. ते सकाळ वृत्तसमूहाशी बोलत होते.
दरम्यान, सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्याकरिता विरोधकांची मते एकत्रित राहिली पाहिजेत. मतांची विभागणी होता कामा नये. मतांची विभागाणी न झाल्यास काय होते हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत दिसले. त्यामुळे विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीमध्ये समन्वय ठेवून महाविकास आघाडीने जागावाटप केले. तर, वेगळे चित्र पहायला मिळेल, असा दावा अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"