Bageshwar Baba On Sant Tukaram Maharaj: “बागेश्वर बाबावर कारवाई झाली पाहिजे, यावर कायदा करण्याची मागणी करणार”: अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 03:31 PM2023-01-31T15:31:32+5:302023-01-31T15:31:50+5:30
Bageshwar Baba On Sant Tukaram Maharaj: धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह असून मी त्यामुळे व्यथित झालो आहे,असे सांगत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.
Bageshwar Baba On Sant Tukaram Maharaj:बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज म्हणजेच बागेश्वर बाबा गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चेत आहेत. मात्र, बागेश्वर बाबाबद्दल पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय वर्तुळातून बागेश्वर बाबावर टीका केली जात असून, त्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बागेश्वर बाबाच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
महापुरुषांचा अपमान करण्याचे काही जणांचे काम जाणीवपूर्वक चालले आहे. यामध्यमातून महागाई, बेरोजगारी यावरील लोकांचे लक्ष विचलित करण्याचे काम सुरु आहे. २७ फेब्रुवारीला राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. तेव्हा अधिवेशनात हा मुद्दा मांडून यासंबंधी कायदा करण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले.
धीरेंद्र शास्त्री महाराजांवर कारवाई झाली पाहिजे
धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह असून मी त्यामुळे व्यथित झालो आहे. महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने मी त्यांचा निषेध करतो. तसेच बेताल वक्तव्यांविरोधात आता कायद्याची गरज आहे. लाखो वारकरी बांधव तुकाराम महाराजांच्या वचनाला आजही मानतो. हे अश्लाघ्य वक्तव्य केल्याबद्दल धीरेंद्र शास्त्री महाराजांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. तसेच ज्याप्रकारे अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायदा करण्यात आला आहे. तसाच महारापुरुषांच्या विरोधात जे वाचाळवीर बेताल वक्तव्य करुन नवीन समस्या निर्माण करतात. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. कुणाच्यातरी भावना दुखावल्यामुळे कायदा हातात घेतला जातो, कोण शाई फेकण्याचा प्रयत्न करतो, निषेधासाठी काळे झेंडे दाखविले जातात. हे सर्व थांबविण्यासाठी महापुरुषांचा अपमान होऊ नये, यासाठी काहीतरी कायदा केला पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते मात्र शांत आहेत. या बाबाची बडबड एकवेळ मध्य प्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेले महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही. अशा माणसाला सरकारने तुकोबारायांच्याच शब्दांत उत्तर द्यावे. तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजरा!, असे ट्विट रोहित पवार यांनी केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"