Maharashtra Politics: शिवाजी पार्कवर नेमका कोणाचा दसरा मेळावा (Dasara Melava) होणार, यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. शिंदे गट आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे दोघांकडून दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर घेण्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर भाष्य करत, बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाची आठवण करून दिली आहे.
दसरा मेळावा नेमका कोणाचा याबाबत बोलताना, खरे पाहिले तर हा वाद निरर्थक आहे. दोन्ही गटांनी आपआपल्या परीने दसरा मेळावा घ्यावा. हा मान बाळासाहेबांच्याच शिवसेनेचा आहे. आता इथून पुढे उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे नेतृत्व करतील, असे बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवरू सांगितले होते. हे आपण सर्वांनीच ऐकले आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा मान हा शिवसेनेचाच आहे, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
माझ्यापेक्षा जास्त काम करणारे कुणी असेल, तर...
आम्हाला काहीही वाटत नाही. असे खूपजण येतात. गेल्या ५५ वर्षांत असे कितीतरी जण आले आणि कितीतरी जण गेले. खूप लाटा आलेल्या आणि गेलेल्या बारामतीकरांनी पाहिल्या आहेत. बारामतीकरांना खूप चांगले माहिती आहे की, कुणाचे बटण कशा पद्धतीने दाबायचे. ते त्या निवडणुकीत त्यांचे काम चोखपणे बजावतील. याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही, असे सांगत बारामतीमध्ये माझे काम बोलते. त्यामुळे तुम्ही बारामतीची काळजी करू नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणारे कुणी असेल, तर बारामतीकर त्याचा विचार करतील, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या काटेवाडी शाखेचे उद्घाटन केले. यावेळी आमदार राहुल कुल गोपीचंद पडळकर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते. यादरम्यान चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरू केली आहे. तसेच, २०२४ साली बारामतीचा खासदार हा भाजपचाच असेल असा निर्धार व्यक्त केला.