Maharashtra Politics: दसरा मेळाव्यात एकाच वेळी दोन्ही भाषणे सुरु झाली तर कुणाचे भाषण ऐकणार? अजित पवार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 03:44 PM2022-09-30T15:44:48+5:302022-09-30T15:46:27+5:30
Maharashtra News: आपल्या हटके वक्तव्यांसाठी लोकप्रिय असणाऱ्या अजित पवारांनी पुन्हा आपल्या या खास शैलीत प्रतिक्रिया व्यक्त केली.
Maharashtra Politics: आताच्या घडीला अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष्य शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दसरा मेळाव्याकडे (Dasara Melava) लागले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगीनंतर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदान म्हणजेच शिवतीर्थावर होणार हे निश्चित झाले. तर एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर मेळावा घेणार आहेत. दोन्ही गटाकडून या मेळाव्यांचे टीझरही लॉंच झाले आहेत. मात्र, यातच दोन्ही मेळाव्यांच्या वेळाही जवळपास सारख्याच असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना कोणाचे भाषण ऐकणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवारांनी आपल्या खास शैलीत मिश्किल उत्तर दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वांद्रा कुर्ला संकुल येथील मैदानावर सायंकाळी पाच वाजता शिंदे गटाचा दसरा मेळावा होईल, असे जाहीर केले आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा टीझर लॉन्च झाला असून, हा मेळावाही याचदरम्यान सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांची भाषणे एकाच वेळी सुरु होणार का, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात मीडियाशी बोलत असताना अजित पवार यांना विचारणा करण्यात आली.
एकाच वेळी दोन्ही भाषणे सुरु झाली तर कुणाचे भाषण ऐकणार?
एकाच वेळी मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे भाषण सुरु झाले तर दसरा मेळाव्याचे कोणाचे भाषण तुम्ही ऐकणार असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. दसरा मेळाव्याला कोणाचेही भाषण ऐकले आणि एकाच वेळी दोन्ही भाषणे सुरु झाली तर उद्धव ठाकरेंचे भाषण पहिल्यांदा ऐकू. मग एकनाथरावांचे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच प्रसारमाध्यमांना टोला लगावत, तुम्ही रिपीट करतच असता. तुमचे कामच आहे. त्यामुळे दुसरे चॅनेल लावायचे आणि दुसरे भाषण ऐकायचे. यात काय? अर्धा तास पुढे मागे झाले तरी बिघडले कुठे? दिल्लीचे कसे दाखवत होता. एकीकडे उद्धव ठाकरेंचे भाषण सुरु होते. ते भाषण झाल्यानंतर तुम्ही एकनाथरावांचे भाषण दाखवले. त्यात तुम्ही तरबेज आहात. आम्ही बघणारे काही काळजी करण्याचे कारण नाही, असा चिमटा अजित पवार यांनी काढला.
दरम्यान, शिंदे गटानंतर शिवसेनेने जारी केलेल्या टीझरमध्ये, निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार या टॅगलाईनसह व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातील सभेचे जुने फोटो दिसून येतात. त्यामध्ये, बाळासाहेब शिवसैनिकांना संबोधित करतानाचे छायाचित्र आहे. तसेच, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो या आवाजातील उद्धव ठाकरेंचा संवाद, त्यांच्या सभांचे व्हिडिओ आणि डौलात फडकणारा भगवा ध्वज दिसून येत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"