महाविकास आघाडी म्हणजे मल्टीस्टारर सिनेमा?; अजित पवारांचं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 05:06 PM2020-01-27T17:06:47+5:302020-01-27T17:10:30+5:30
पत्रकारांच्या प्रश्नाला अजित पवारांचं उत्तर
पुणे: महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे मल्टीस्टारर सिनेमा असल्याचं सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केलं होतं. अशोक चव्हाण यांच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जुन्या कढीला कशाला ऊत आणायचा. बरं चाललंय, चालू द्या, असं म्हणत अजित पवारांनी चव्हाण यांच्या विधानावर फारसं भाष्य करणं टाळलं. पवारांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.
पुण्यात आज अजित पवारांनी नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन मागील सरकारच्या कामाचा आणि योजनांचा आढावा घेतल्याचं अजित पवारांनी पत्रकारांना सांगितलं. सर्व विभागांना निधीचं योग्य वाटप होणार असल्याची हमीदेखील त्यांनी यावेळी दिली. या बैठकीला पालकमंत्रीदेखील उपस्थित होते, असं पवारांनी सांगितलं. चंद्रपुरातल्या दारुबंदीवर कोणताही पुनर्विचार केला गेला नसल्याचं ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार म्हणजे मल्टीस्टारर सिनेमा असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले होते. त्याबद्दल प्रश्न विचारलं असता, अजित पवारांनी फारसं बोलणं टाळलं. जुन्या कढीला कशाला ऊत आणायचा. बरं चाललंय, चालू द्या. मला माझ्याकडून काही अडचण आणायची नाही. माझे अधिकारी वेळेत यायला तयार आहेत मी काम करतोय, अशी त्रोटक प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
काय म्हणाले होते अशोक चव्हाण?
तीन पक्षाचं सरकार म्हणजे मल्टीस्टारर सिनेमा. सिनेमात तीन-तीन हिरो पाहिजेत, असं सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलं होतं. संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे, हे शिवसेनेकडून लिहून घ्या, असं सोनिया गांधींनी सत्ता स्थापनेच्या वेळी सांगितलं होतं, असंदेखील अशोक चव्हाण म्हणाले होते. तीन पक्षाचं सरकार म्हणजे मल्टिस्टारर सिनेमा. सुदैवानं आमचा सिनेमा सध्या बरा चालला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे, कुणालाही वाटलं नाही की आम्ही एकत्र येऊ. पण हल्ली मल्टिस्टारर सिनेमाचा जमाना आहे. सिनेमात तीन-तीन हिरो पाहिजेत, असं चव्हाण यांनी म्हटलं.