Maharashtra Politics: “एकमेकांना गद्दार म्हणून राज्याचे प्रश्न सुटणार का?”; अजित पवारांनी चांगलंच सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 12:12 PM2022-10-10T12:12:43+5:302022-10-10T12:12:52+5:30
Maharashtra News: माझ्या सभेत शेवटच्या रांगेपर्यंत एकही माणूस उठला नाही. कारण मी गद्दारी करुन आलेलो नाही, असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला.
Maharashtra Politics:एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका होताना दिसत आहे. यावरून अद्यापही जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील सद्यस्थितीवरून शिवसेना, शिंदे गट आणि भाजपला सुनावत कानपिचक्या दिल्याचे सांगितले जात आहे. कमेकांना गद्दार म्हणून राज्याचे प्रश्न सुटणार का?, असा थेट सवाल अजित पवार यांनी केला आहे.
दोघे एकमेकांना गद्दार बोलतात...त्याने प्रश्न सुटणार आहेत का? दोन लाख लोकांचे गेलेले रोजगार, देशातील महागाई यावर बोलायला कोणी तयार नाही. कोणी कोणाची माणसे फोडतंय. लोकशाहीचा नुसता खेळखंडोबा झाला आहे, अशी टीकाही अजित पवार यांनी केली आहे.
राज्याच्या विकासावर परिणाम होतोय
सध्याच्या सुरू असलेल्या राज्यातील गोंधळामुळे कुठलं सरकार किती दिवस टिकेल, हे अधिकाऱ्यांच समजेना. त्यामुळे त्यांची तारेवरची कसरत सुरू असून, याचा राज्याच्या विकासावर परिणाम होत आहे. दसऱ्याच्या दिवशी तर काय बीकेसी मैदान... शिवतीर्थ मैदान.. त्यांनी पांढरा ड्रेस घातला आहे. ते उतरले. ते आता पायऱ्या चढत आहेत. काहीही पाहायला मिळत असल्याची खिल्ली उडवत हा गद्दार तो गद्दार म्हणून राज्याचे प्रश्न सुटणार आहेत का, अशी विचारणा अजित पवारांनी केली आहे.
दरम्यान, सत्ताधारी मंडळी सर्वसामान्यांचे सरकार आहे, असे सांगत आहेत. परंतु सर्वसामान्यांसाठी काही केलेले दिसत नाही. दसऱ्याच्या मेळाव्याला ते म्हणाले होते की, माणसे स्वत:हून आली होती. मग त्यांच्या भाषणात लोक खुर्च्या सोडून का गेले?, अशी विचारणा करत माझ्या सभेत शेवटच्या रांगेतील एकसुद्धा माणूस उठला नाही. कारण मी गद्दारी करुन आलेलो नाही, असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"