जालना: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राम मंदिरावरील विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. ज्यांना अद्याप आपल्या वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?, अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. उद्धव ठाकरे 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या प्रस्तावित दौऱ्यावरदेखील अजित पवार यांनी तोंडसुख घेतलं. शिवसेनेचे नेते म्हणे 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली. ज्यांना वडिलांचं स्मारक अद्याप बांधता आलं नाही, ते अयोध्येत जाऊन काय दिवे लागणार?, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. औरंगाबाद महापालिकेच्या कारभारावरदेखील पवार यांनी सडकून टीका केली. गेल्या 20 वर्षांपासून औरंगाबाद महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. ज्यांना कचरा साफ करता आला नाही, ते राज्य काय चालवणार?, असा खोचक सवाल ही पवार यांनी केला.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरील शिवसेनेच्या भूमिकेवरही अजित पवारांनी कडाडून टीका केली. संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी सरकार चालढकल करत आहे. तर कर्जमाफी हा घोटाळा असल्याची उपरती शिवसेनेला आता झाली आहे. एकूणच यात घोटाळा झाला असेल तर, तुम्हीदेखील या सरकारचाच एक भाग आहात. हे विसरून कसे चालेल?, असा सवाल पवारांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवरही टीकेची झोड उठविली. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यांना हे केंद्र सरकार मदत करत आहे. मेहुल चोक्सीला तर एका केंद्रीय मंत्र्यांच्या जावयानं परदेशात जाण्यासाठी मदत केल्याचे पुढे आले आहे, अशा शब्दांमध्ये पवार केंद्र सरकारवर बरसले.
ज्यांना वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 8:15 AM