आपण महाराष्ट्रात राहतो, योगींनी काय करावं त्यांचा अधिकार; लाऊडस्पीकरवर अजित पवारांची रोखठोक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 03:07 PM2022-04-28T15:07:21+5:302022-04-28T15:07:51+5:30

मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस आहे का?, अजित पवारांनी एका वाक्यात केलं स्पष्ट.

ncp leader ajit pawar speaks about mns raj thackeray louspeakers in maharashtra uttar pradesh yogi adityanath | आपण महाराष्ट्रात राहतो, योगींनी काय करावं त्यांचा अधिकार; लाऊडस्पीकरवर अजित पवारांची रोखठोक प्रतिक्रिया

आपण महाराष्ट्रात राहतो, योगींनी काय करावं त्यांचा अधिकार; लाऊडस्पीकरवर अजित पवारांची रोखठोक प्रतिक्रिया

googlenewsNext

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भोग्यांबाबत भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिला होता. यानंतर राज्य सरकारनं यासंदर्भात सर्वपक्षीय बैठकही आयोजित केली होती. “राज्यात सलोखा राहावा यासाठी राज्यसरकारने सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. मनसे सोडून सर्व पक्षांनी एकत्र भूमिका घेतलेली आहे. भाजपने तर बैठकीवर बहिष्कार टाकला होता. सुप्रीम कोर्टाने लाऊडस्पीकरबाबत आधीच नियमावली दिलेली आहे. उद्या जर एखादा निर्णय घ्यायचा असल्यास सर्वांसाठी एकच कायदा करावा लागेल. योगींनी उत्तरप्रदेशमध्ये काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्र सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाणारा आहे,” अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.

“इतके वर्ष सर्व चालत आलेले आहे. आतापर्यंत भाजपला कुणी थांबवले होते. आजच ही मागणी का केली जात आहे? उद्या सुप्रीम कोर्टाने काही आदेश काढला तर सर्व धर्माच्या भाविकांना तो निर्णय लागू होईल, याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे. भारतातील महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात जातीय दरी निर्माण करुन आज जातीय सलोखा बिघडवण्याचे काम सुरु आहे. नको त्या गोष्टी लोकांच्या मनात आणून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राला परवडणारा नाही, सर्वांनी गांभीर्याने या गोष्टी घेऊन मनाचा मोठेपणा दाखवावा लागेल,” असेही पवार म्हणाले.

मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती तर राज ठाकरेंनी शरद पवारांना जातीयवादी म्हटले असते का? राज ठाकरे आज भाषणे करत असताना ते भाजपवर टीका करत नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरच टीका करतात. मात्र लोकसभेला त्यांचा अजेंडा वेगळा होता. त्यावेळी त्यांनी फक्त भाजपला टार्गेट केले होते. ही वस्तूस्थिती मान्य करावी लागेल. २०१९ ला आघाडीला अप्रत्यक्ष फायदा होईल, अशा पद्धतीने त्यांनी सभा घेतल्या होत्या याची आठवण त्यांनी करुन दिली.

असं भारतभर घडतं
२०१४ च्या निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यांचे पती रवी राणा हे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होते. २०१९ ला पुन्हा रवी राणा आणि नवनीत राणा हे राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार होते, २०१९ ला नवनीत राणा यांना पक्षाने तिकीट दिलेले नव्हते. ज्यांना आपण पुरस्कृत करतो, ते आपल्यासोबतच राहतील का? हे तपासण्याचे आपल्याकडे अजून तरी यंत्र नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकत्र सरकार येईल असे कुणालाच वाटले नव्हते. एकेकाळी ममता बॅनर्जी आणि भाजप एकत्र होते, आज ममतादीदी भाजपच्या विरोधक आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार कधी भाजपसोबत असतात कधी भाजपचे विरोधक होतात. त्यामुळे अशा घटना आपल्या इथेच नाही, तर भारतभर घडत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Web Title: ncp leader ajit pawar speaks about mns raj thackeray louspeakers in maharashtra uttar pradesh yogi adityanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.