“दिवसा मतदान करा, तमाशा रात्री बघा, त्या गौतमी पाटीलला बोलवा”; अजितदादांची मिश्किल टिप्पणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 04:36 PM2023-04-25T16:36:26+5:302023-04-25T16:37:49+5:30
Ajit Pawar-Gautami Patil: कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी गौतमी पाटीलसंदर्भात केलेल्या मिश्लिक टिप्पणीनंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
Ajit Pawar-Gautami Patil: राज्यात विविध ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळी सुरू आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत रयत पॅनलच्या माध्यमातून जाहीर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अनेकविध विषयांवर आपल्या खास शैलीत भाष्य करत कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेली अजित पवार यांनी गौतमी पाटील यांच्यावर केलेल्या मिश्किल टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
माझ्या विषयी अनेक बातम्या पसरवण्याचे काम केले. पत्रकार जरा कुठ गेले तर अजित पवार नॉट रिचेबल. बाकी लोक आहेत की... माझ्यामागे का लागलेत बाबा? एखाद्याच्या मागे लागायचे म्हणजे किती मागे लागायचे? मी असे का बोललो, असे विचारले जाते. मी मला येते ते बोलतो. लोकांना असे वाटते की, २०१९ ला जसे केले, तसेच जातो की काय. पण तुम्हाला सांगतो की मी कायमच राष्ट्रवादीमध्ये राहणार आहे. अजित पवार आणि बारामती असे एक भावनिक नाते तयार झाले आहे. येणाऱ्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.
दिवसा मतदान करा, तमाशा रात्री बघा, त्या गौतमी पाटीलला बोलवा
दिवसा मतदान करा, यात्रा-जत्रा रात्री, काय कापाकापी करायची, तमाशा बघायचा तो रात्री बघा, त्या पाटील बाईला बोलवा, काय त्यांचे नाव गौतमी, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अजित पवार यांनी कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच विरोधक इथे काही खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधकांना माझे सांगणे आहे की, राज्यात आणि केंद्रात त्यांचे सरकार आहे. त्यांनी काय आणले आपल्या बारामतीसाठी? यांनी काहीच आणले नाही, जे आहे ते बिघडवण्याचे काम सुरू आहे, अशी टीकाही अजित पवार यांनी केली.
दरम्यान, मी विशिष्ट नेत्यांच्या बाबतीत सॉफ्ट आहे, असे बोलले जातो. पवार साहेबांचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आपण पुढे घेऊन जाण्याचे काम करतो आहे. अनेक राज्यात विधान भवनात हाणामारी होते. मी सरकारला कोणताही सॉफ्ट कॉर्नर देत नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"