मुंबई : राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक मुद्द्यांवर गाजताना दिसत आहे. सरकार आणि विरोधक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगताना दिसतोय. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणात झडताना पाहायला मिळत आहेत. विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेत कोरोनासंदर्भात निवेदन देताना अजित पवार (Ajit Pawar) यांची टोलेबाजी पुन्हा एकदा सभागृहाने अनुभवली. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना कोरोना झाला नाही, असे सदस्यांकडून सांगण्यात आले. त्यावरून अजित पवार यांनी फिरकी घेतली आणि सभागृहात एकच हशा पिकला. (ncp leader ajit pawar take spin on bjp leader pravin darekar on corona)
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या संपूर्ण राज्यासाठी चिंतेचा विषय ठरत चालली आहे. राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात यासंदर्भात उल्लेख केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संदर्भात निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना करोना झाला नसल्याचे सदस्यांकडून सांगण्यात आले. यावर प्रवीण दरेकर यांच्या जाकिटामुळेच त्यांना कोरोना झाला नसेल, अशी फिरकी अजित पवार यांनी घेतली. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
ज्यांना जय श्रीराम म्हणायची लाज वाटते, त्यांना शिवसेनेचा पाठिंबा; राम कदम यांची टीका
राज्यातील मृत्युदर घटला
कोरोना परिस्थितीविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यातील मृत्यूदर सुदैवाने घटताना पाहायला मिळत आहे. कोरोना झाला तरी बहुतांश रुग्णांना रुग्णालयात जावे लागत नाही. अनेक जण घरीच राहून औषधे घेऊन बरे होत आहेत. आताच्या घडीला मंत्रिमंडळातील ७ ते ८ मंत्री आणि दोन्ही बाजूचे काही मान्यवर आमदार करोनाग्रस्त आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.
दरेकरांचे जाकीट पाहून कोरोना जवळ गेला नसेल
एका गोष्टीचे मला विशेष वाटते की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रवीण दरेकर आणि सभापती रामराजे निंबाळकर यांना कोरोना झाला नाही. विधानसभेत मलाही झाला, फडणवीसांनाही झाला. तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे तुम्हाला झाला नसेल. किंवा प्रवीण दरेकर यांचे जाकीट पाहून तो जवळ गेलाच नसेल, म्हटला असेल कुठे जाकिटातून आत शिरायचं असंही काही झालं असेल तर माहिती नाही, अशी कोटी अजित पवार यांनी केली.
नाहीतर माझ्या नावावर पावती फाडाल
तुम्हा तिघांनाही कोरोना होऊ नये, अशा आमच्या शुभेच्छा असतील. नाहीतर उद्या कोरोना झाला तर म्हणतील तुझीच दृष्ट लागली आणि म्हणून कोरोना झाला, असं म्हणून माझ्या नावावर पावती फाडू नका, असे म्हणत अजित पवार यांनी टोला लगावला.