Maharashtra Politics: आताच्या घडीला नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये घडलेल्या नाट्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप होत असून, यामागे भाजप असल्याचा दावा केला जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. आमच्यासोबत असताना एकनाथ शिंदे चांगले होते, आता जरा काम बिघडले आहे, असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला आहे.
एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, बेरोजगारी किती वाढली आहे जरा बघा. मध्यंतरी पोलिसांची पदं भरायची होती. १२ हजार पदांसाठी १२ लाख अर्ज आले होते. डॉक्टर, इंजिनिअर्स यांनी अर्ज केले आहेत. पोलीस शिपाई पदासाठी हे अर्ज आले आहेत. किती बेरोजगारी वाढली आहे तुम्हीच बघा. वेदांता फॉक्सकॉन गेला, तो आला असता तर २६ हजार कोटींचा जीएसटी महाराष्ट्राला दर वर्षाला मिळणार होता. पण आता ते होणार नाही, असे अजित पवार म्हणाले. प्रकल्प गुजरातला गेल्यावरून अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर पुन्हा टीका केली आहे.
आमच्यासोबत असताना एकनाथ शिंदे चांगले होते, आता जरा काम बिघडले
एकनाथ शिंदे आमच्याकडे होते तेव्हा चांगले होते. आता जरा काम बिघडले. हे बघा आता काम बिघडले म्हणजे थेट हेडलाइनच होणार, अजित पवार टीका करताना घसरले असेही म्हटले जाणार. पण महाविकास आघाडी सरकार असताना चाकणमध्ये वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प येणार होता. दोन लाख कोटींची गुंतवणूक होणार होती. सभागृहात मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाचा उल्लेख केला होता. पण हा प्रकल्प गुजरातला गेल्यावर काही बोलायला तयार नाही, या शब्दांत अजित पवार यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी माघार घेत स्वत:च्या मुलाला अपक्ष उमेदवार म्हणून उभे केले. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवारच नाही. त्यात आता या राजकीय घडामोडीनंतर मविआत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काहीतरी शिजतेय असे बाळासाहेब थोरातांना आधीच सांगितले होते, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"