मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या सोबत शपथविधी उरकला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच भूकंप झाला. मात्र अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आणि सरकार अवघ्या ८० तासांमध्ये कोसळलं. याबद्दल बोलताना आमचा गनिमीकावा फसल्याची कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली.अजित पवार यांचं वर्णन कसं कराल, असा प्रश्न फडणवीसांना 'एबीपी माझा'च्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर अजित पवार आमच्या फसलेल्या गनिमी काव्याचे नायक असल्याचं गमतीशीर उत्तर त्यांनी दिलं. अजित पवार त्या गनिमी काव्याचे नायक असतील, तर मग तुम्ही कोण होतात, असा प्रतिप्रश्न यानंतर विचारण्यात आला. त्यावर मी फसलेल्या गनिमी काव्याचा सहनायक होतो, असं हजरजबाबी उत्तर फडणवीस यांनी दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवरही भाष्य केलं. पवार राजकारणातले ज्येष्ठ नेते आहेत, असं फडणवीस म्हणाले. पंकजा मुंडे माझ्या सहकारी आहेत. त्या बहिणीसारख्या आहेत. सत्ता असताना जेव्हा जेव्हा त्यांच्यावर आरोप झाले, तेव्हा तेव्हा मी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिलो, असं फडणवीसांना सांगितलं. एकनाथ खडसे अनेकदा मनात नसलेल्या गोष्टी बोलून जातात. त्यामुळे त्यांचं वैयक्तिक आणि राजकीय नुकसान होतं. या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवल्यास त्यांना फायदा होईल, अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या. उद्धव ठाकरे माझे कालही मित्र होते आणि आजही होते, असंदेखील ते पुढे म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांकडून अजितदादांना खास विशेषण; वाचून गंमत वाटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 8:42 PM