पुणे: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातून अनेक उद्योग राज्याबाहेर गेले आहेत. यामुळे राज्यातील आधीच विरोधकांकडून टीका होत आहे. यातच नेहमी राज्याच्या विकासाबाबत भाष्य करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्यानं महाराष्ट्राचं काहीही नुकसान होणार नाही,' असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून उद्योग इतर राज्यात गेल्याचा आरोप विरोधकांकडून होत असतो. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या विधानांमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, 'महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाणं, हे अतिशय चुकीचं आहे. यामुळे प्रचंड बेरोजगारी वाढते. उद्योग बाहेर गेले, तर आपल्या मुलांनी कामं कुठं मागायची. लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प गेल्यानं रोजगार बुडाला आहे,' असं अजित पवार म्हणाले.
ते पुढे म्हणतात, 'एकीकडे राज्यातून मोठे प्रकल्प गेले आणि दुसरीकडे राजकीय व्यक्तीकडून अशाप्रकारचं समर्थन होतं असेल तर दुर्दैव आहे. प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी सर्व राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. यामुळे आर्थिक सुबत्तता निर्माण होऊन राज्यात रोजगार निर्माण होतील,' असंही अजित पवार म्हणाले. अजित पवार पिंपरीत सुरू असलेल्या 18व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनात बोलत होते.