मुंबई :शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, समर्थन देण्यावरून सुरू झालेलं ट्विटरवॉर शमण्याचं नाव घेताना दिसत नाही. सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटची चौकशी करण्यात येण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टीका केली होती. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी याला उत्तर देताना मंगेशकर असो वा तेंडुलकर, सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी केली आहे. (ncp leader amol mitkari criticized devendra fadnavis over Celebrities tweet)
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करत सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे, असे म्हटले आहे. ''सेलिब्रिटींच्या ट्वीटची चौकशी झालीच पाहिजे. मग, मंगेशकर असोत की तेंडुलकर! 'भारतरत्नांनी' पदाला साजेसं असंच बोलावं वागावं व लिहावं. फडणवीसांनी भारतरत्नांची बाजू घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा आदर्श परिपाठ सुद्धा वाचून घ्यावा'', असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.
शेतकरी आंदोलन हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. भारताच्या अंतर्गत मुद्द्यावरून परदेशातील सेलिब्रिटिंनी केवळ बघ्याची भूमिका घ्यावी. देशातील प्रश्न आमचे आम्ही सोडवू, अशा आशयाचे ट्विट्स भारतरत्न लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांसह अनेक कलाकार, खेळाडू आणि दिग्गज मंडळींनी केले होते. यानंतर शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटींच्या ट्विटमध्ये बरेच साधर्म्य दिसून येत असल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते.
हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट उघड; नांदेडमधून खलिस्तान समर्थक दहशतवादी अटकेत
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशानंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. राज्य सरकारचा सेलिब्रेटीच्या ट्विट करण्याचा निर्णय हा संतापजनक असून कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत, निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.