Maharashtra Politics: “मैं गोडसे के दौर मे गांधी के साथ हुं”; अमोल मिटकरींची भाजपवर टीका; ‘भारत जोडो’त सहभागी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 12:32 PM2022-11-19T12:32:22+5:302022-11-19T12:34:04+5:30
Maharashtra News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला.
Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होत भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या विधानानंतर भाजप, शिंदे गट आणि मनसे चांगलीच आक्रमक झाली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले होते. तर भाजप नेत्यांकडून राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. तसेच भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधण्यात आला. यातच राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला.
मैं गोडसे के दौर मे गांधी के साथ हुं
अमोल मिटकरींनी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. ये किसने कहा आपसे मैं आँधी के साथ हुं? मैं गोडसे के दौर मे "गांधी" के साथ हुं ll असे ट्विट अमोल मिटकरींनी केले आहे. सोबत भारत जोडो यात्रेचा हॅशटॅगही लावला आहे. तसेच यापूर्वी केलेल्या एका ट्विटमध्ये, राहुल गांधींच्या भाषणातील एक महत्त्वाचा मुद्दा ,"छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ यांनी घडविले"! मात्र महाराष्ट्रात सद्य स्थिती धर्मांध विचारसरणी हे मान्य करायला तयार नाही. खोटा इतिहास पसरविणाऱ्यांची पिलावळ मोठ्या प्रमाणात वाढली त्या पिलावळी ला सणसणीत चपराक, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. दुसऱ्या एका ट्विटमध्ये, संतनगरी शेगाव मधील राहुल गांधी यांचे अभ्यासपूर्ण भाषण ऐकले .निश्चितच हे भाषण ऐकून भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला. भाजपकडून अप्रत्यक्ष पाठवलेले "काळे झेंडे" सुद्धा या भाषणामुळे इतिहास जमा झाले, असा टोला अमोल मिटकरींनी लगावला.
ये किसने कहा आपसे मैं आँधी के साथ हुं ?
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 19, 2022
मैं गोडसे के दौर मे "गांधी" के साथ हुं ll
#BharatJodoYatrapic.twitter.com/10NeLxoT3W
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा काढण्याचे काहीच कारण नव्हते. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असे नाही. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. राहुल गांधी यांनी अशा प्रकारचे विधान करण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते हे लक्षात घ्या, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"