Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने छापेमारी केली. हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी १२ तासांहून अधिक काळ ईडीकडून कारवाई सुरू होती. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी, रोखायचे असेल तर रोखून दाखवा, असे आव्हान दिले आहे. यातच किरीट सोमय्यांनी कोल्हापुरच्या लाल मातीशी पंगा घेतला आहे, गाडल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका केली आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईनंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले असून, भाजपवर हल्लाबोल करण्यात येत आहे. किरीट सोमय्या यांची तोतरी जबान वारंवार महाविकास आघाडीविरोधात फडफडते. काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात गरळ ओकते, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
कागलची तांबडी माती ही विखारी वृत्ती गाडल्याशिवाय राहणार नाही
किरीट सोमय्यांचा नेम चुकला. शाहूंच्या कोल्हापूरच्या मातीशी त्यांनी पंगा घेतला. कागलची तांबडी माती ही विखारी वृत्ती गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अमोल मिटकरींनी दिला आहे. ईडी आणि सीबीआय या यंत्रणा केंद्र सरकारच्या गुलाम आहेत. अनिल देशमुखांविरोधात गुन्हे दाखल झाले. पण अजूनही त्यात तथ्य सापडले नाही. तसेच हे प्रकरण आहे. किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत भावना गवळी, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, यशवंत जाधव यांच्यावर तसेच मुश्रीफ यांच्यासारखेच आरोप केले होते. मात्र, आता किरीट सोमय्या काहीच बोलत नाही, या शब्दांत निशाणा साधत, ईडा-पिडा टळो आणि महाराष्ट्रातील हे दळभद्री सरकार जावो, बळीराजाचे राज्य येवो, असे अमोल मिटकरी म्हणाले.
दरम्यान, कोल्हापूरला सर्वप्रथम आई लक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी जात आहे. त्यामुळे मी मुश्रीफ यांना चॅलेंज करतो, त्यांनी आता मला रोखूनच दाखवावे. मागच्या वेळी माफिया सरकार होते. त्यामुळे मला रोखले गेले होते. आता मला तुम्ही रोखू शकत नाही. मी येत आहे. मुश्रीफ यांनी मला थांबवून दाखवावेच, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"