Maharashtra Political Crisis: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. रविवारी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत झालेल्या चौकशीनंतर अपेक्षित सहकार्य न करण्याच्या कारणावरून ईडीने संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केली. संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच आता संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईवरून टीका करताना, राष्ट्रवादी काँग्रेसने संजय राऊत यांची पाठराखण केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी संजय राऊतांना पाठिंबा दर्शवला आहे.
ईडी कारवाईनंतर अमोल मिटकरी यांनी ट्विट करत भाजप, केंद्रीय यंत्रणांवर खरमरीत टीका केली आहे. तसेच संजय राऊत यांचे समर्थन करीत, बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक दिल्लीसमोर झुकला नाही याचा अभिमान आहे, असे म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये रविवारी सुद्धा सुरू ठेवावीत. केंद्र व राज्य सरकारने ED चा आदर्श घ्यावा, असा टोलाही शिंदे-फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारला लगावला आहे.
‘आजादी के 75 साल’च्या नावाखाली देशभक्तीचे सोंग सुरू
दुसऱ्या एका ट्विटमध्ये, भाजपाने हर घर तिरंगा ही मोहिम आखली आहे. राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, अनेक जिल्हे महापुरात आहेत, शेती वाहून गेली, महागाई वाढली, गॅस सिलेंडर महागले, कष्टकरी आणि गरीब माणूस रोज भरडत चाललाय तर दुसरीकडे ‘आजादी के 75 साल’च्या नावाखाली देशभक्तीचे सोंग सुरू असल्याची बोचरी टीकाही अमोल मिटकरी यांनी केली आहे. कुठलीही ताकद लावली असती तरी फडणवीस शिवसेना फोडू शकले नसते म्हणून हे काम एका ठराविक गटाकडून सुप्त पद्धतीने केंद्रीय स्तरावरून सुरू झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन बॅनरवर मोदी, शहा, नड्डा झळकू लागले आहेत. केवळ सर्वसामान्य शिवसैनिक शिवसेनेच्या बाजूला खंबीरपणे उभा आहे, असा दावाही मिटकरींनी केला.
दरम्यान, कोर्टाचा निर्णय कसाही आला तर तो भाजपच्याच पथ्यावर पडेल. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मात्र जनतेसमोर जातेवेळी ओढवणारी नामुष्की पाहण्यासारखी असेल. सद्यस्थिती देवेंद्र फडणवीस एक पाऊल मागे येऊन वेळ प्रसंग पडला तर अपमानही पचवून घेत आहेत. सर्व प्रकरणात भाजपचा तिळमात्र तोटा होणार नाही. शिंदे गटाच्या माध्यमातून शिवसेनेची तोडफोड करण्याचे काम छुप्या पद्धतीने सुरू आहे आणि हे सर्व दिल्लीवरून ठरलेले आहे, असा घणाघाती आरोप अमोल मिटकरींनी ट्विटरवरून केला आहे.