‘सत्तेचा ताम्रपट’वरुन अजितदादांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, “राज्याचा कारभार उद्धव ठाकरे…”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 02:18 PM2022-05-11T14:18:19+5:302022-05-11T14:19:47+5:30
काही नेते समाजात तेढ, दुही निर्माण होईल, अशी विधाने करत कायदा हातात घेण्याची भाषा करत आहेत, ते योग्य नाही, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
सांगली: मशिदींवरील भोंग्यांबाबत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्यांविरोधात राज्यभर आंदोलन केले. मात्र, यावेळी पोलिसांनी शेकडो मनसे कार्यकर्त्यांविरोधात विविध प्रकारची कारवाई केली. या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना एक खरमरीत पत्र लिहिले. राज ठाकरे यांच्या पत्रानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
अयोध्या काय किंवा पंढरपूर, ही धार्मिक स्थळे प्रत्येकाची श्रद्धास्थाने आहेत. त्यामुळे इथे जाण्यासाठी कुणाचीच हरकत नाही. मात्र, सवंग लोकप्रियतेसाठी आणि जमलेच तर बिनखर्चाने जाता यावे म्हणून काहीजण अयोध्येला जाण्याचा बोभाटा करीत आहेत, अशा शेलक्या शब्दांत अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. याचवेळी त्यांनी कायदा हातात घेऊन किंवा कायद्याला आव्हान देत दोन समाजात तेढ निर्माण करण्याची भाषा करत असेल तर अशांविरुद्ध कायद्याने कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकशाहीत जनता ही सार्वभौम असते
काही राजकीय पक्षांचे नेते अलीकडे समाजात तेढ, दुही निर्माण होईल, अशी वक्तव्ये करून कायदा हातात घेण्याची भाषा करत आहेत ते योग्य नाही. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही जन्माला येत नाही. लोकशाहीत जनता ही सार्वभौम असते. त्यामुळे हुकूमशाहीसारखी भाषा कुणी करू नये. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र संविधान, घटना आणि कायदा यापेक्षा कोणीही मोठा नाही. पुरोगामी महाराष्ट्रात महापुरुषांची नावे घेताना आम्ही त्यांच्या विचाराने वाटचाल करत आहोत. त्यामुळे राज्यात सलोखा राखण्याचे काम आम्ही करत आहोत. त्याला आव्हान देण्याची कृती करणाऱ्यांविरोधात सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
दरम्यान, राज्याचा कारभार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चालला आहे. त्याआधी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली होता. त्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे, विलासराव यांच्यासारख्या वेगवेगळ्या मान्यवरांनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे हे गेल्या अनेक वर्ष आपण पाहत आहतो. अशा पद्धतीने काम करताना काही अल्टिमेटम देतात, हेही बरोबर नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.