मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांची आज पुण्यात सभा पार पडली. अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आजच्या सभेत राज यांनी चौफेर टोलेबाजी करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. "शरद पवार म्हणतायत बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय," अशा शब्दांत राज ठाकरेंनी टीका केली. राज ठाकरेंच्या या टीकेला आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यावर प्रत्युत्तर दिले आहे.
राज ठाकरेंच्या सभेनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधाल. यावेळी त्यांना राज ठाकरेंच्यी टीकेविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, "राज ठाकरेंनी त्यांना हवं ते म्हणावं. आम्हाला फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलायचंय. मी कालदेखील जळगाव, शहापूर, डहाणू, सिंदखेड राजा अशा ठिकाणी गेलो, तिथेही माझी भूमिका तीच राहिली आहे. आमच्या भूमिकेतून महाराष्ट्रातल्या मुलांना रोजगार निर्माण होणार आहे, यातून जातीय सलोखा निर्माण होणार आहे. यातून राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा हाताळण्यात पोलिसांना मदत होईल. या अशा गोष्टींनाच आम्ही महत्व देणार आहोत," अशी असं अजित पवार म्हणाले.
"शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल तर..."सभेत बोलताना राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला. "आमच्या शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल, तर यापलीकडे काय बोलायचं? हे सत्तेत इतके मश्गूल आहेत की यांना कशाची पर्वा नाही. महाराष्ट्रातली जनता बेपर्वा वागते, निवडणुकीच्या तोंडावर सगळ्या गोष्टी विसरायच्या आणि भलत्याच गोष्टीवर मतदान करायचं."
"बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय""जनतेने राजकारण समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्हाला गृहीत धरून हे चालणार. काल शिवसेनेतलं कुणी तरी बोललं की, महाविकास आघाडी सरकार हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावर कहर म्हणजे शरद पवार म्हणतायत आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं," असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.