मुंबई - फोन टॅपिंगच्या आरोपांवरून राज्यातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभेत खळबळजनक आरोप केला होता. 2016-17 मध्ये आपण भाजप खासदार असताना आपला फोन टॅप केला जात होता, असे त्यांनी म्हटले होते. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोले यांच्या या आरोपांचे समर्थन केले आहे.
अजित पवार म्हणाले, नाना पटोले यांच्या आरोपत तथ्य आहे. राजकीय नेते आणि लोक प्रतिनिधी यांचे फोन खोटी नावं देऊन टॅप केली जात होती. असेच नाना पटोले यांच्या सोबतही घडले आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय समितीच्या माध्यमाने चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. एवढेच नाही तर, असे राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी अथवा सार्वजनिक सुरक्षिततेसाठी करण्यात आले तर ठीक आहे. पण वैयक्तीक फायद्यासाठी असे करणे बेकायदेशीर आणि लोकशाही विरोधी आहे, असेही पवार म्हणाले.
गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी; नाना पटोले यांनी दाखल केली आहे याचिका
पटोलेंचा आरोप खळबळजनक -नाना पटोले यांचा आरोप म्हणजे, तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारवर थेट हल्ला आहे. पटोले यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत दावा केला होता, की 2016-17 मध्ये ते भाजपचे खासदार होते आणि राज्यात फडणवीस सरकार होते. तेव्हा एका फेक नावाने त्यांचा फोन टॅप करण्यात आला होता.
अमजद खान नावाच्या ड्रग तस्कराच्या नावाने टॅपिंग -पटोले यांनी म्हटल्याप्रमाणे, तेव्हा अमजद खान नावाच्या ड्रग तस्कराच्या नावाने त्यांचा फोन टॅप करण्यात येत होता. आता नाना पटोले हे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार आहेत. पटोले यांच्या या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांनी या आरोपाची तपासणी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.