NCP Ajit Pawar Vs Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामती इथं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना केलेल्या एका वक्तव्याची राज्यभर मोठी चर्चा झाली. "आगामी लोकसभा निवडणुकीत ही आमची शेवटचीच निवडणूक आहे, असं सांगून काही लोकं तुम्हाला भावनिक करतील. पण खरंच कधी शेवटची निवडणूक आहे, हे मला माहीत नाही. परंतु तुम्ही भावनिक होऊ नका," असं म्हणत अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत मी देईल त्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं. आपल्या वक्तव्यातून शरद पवार यांच्यावर निशाणा साधणाऱ्या अजित पवार यांच्याविरोधात कालपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आक्रमक झाले. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेत्यांनी अजित पवार हे शरद पवारांच्या मृत्यूची वाट पाहात आहेत का? असा घणाघाती सवाल विचारत टीकास्त्र सोडलं. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी काल केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत टीकाकारांवरही पलटवार केला आहे.
बारामतीत केलेल्या वक्तव्यावर खुलासा करताना अजित पवार म्हणाले की, "काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे," अशी पोस्ट अजित पवार यांनी त्यांच्या 'एक्स' हँडलवर लिहिली आहे.
जितेंद्र आव्हाडांनी घेतला होता खरपूस समाचार
अजित पवार यांनी काल शरद पवारांवर निशाणा साधल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी टोकदार टीका केली होती. "अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली आहे. काकाच्या मृत्यूची वाट बघत आहेत. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता. काकीचे कुंकू कधी पुसले जाईल याची तुम्ही वाट पाहताय, तुमच्यासोबत काम केल्याची आता लाज वाटत आहे. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले, तिचे कुंकू कधी पुसले जाईल याची आज तुम्ही वाट बघत आहात. असले घाणेरडे राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते. ही महाराष्ट्राची आणि बारातमीची जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल,' असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता.