Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते सत्ताधारी शिंदे-भाजप सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. तर शिंदे गट आणि भाजपकडूनही याला प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच शिंदे गट आणि भाजपतील इन्कमिंगही सुरू आहे. या घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे सध्या चर्चेत आहेत. शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी राज्यात फडणवीसांची भेट घेतली आहे. शिंदे-फडणवीस यांच्या या भेटीमुळे विविध चर्चांना ऊत आल्याचे सांगितले जात आहे.
बबनदादा शिंदे यांनी सांगितले देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे कारण
बबनदादा शिंदे यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत भेट घेतली होती. राजन पाटील यांनी कारखान्याच्या कामानिमित्ताने भेट घेतल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता पुन्हा बबनदादा शिंदे यांनी दुसऱ्यांदा फडणवीसांची भेट घेतली आहे. बबनदादा शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमागचे कारण सांगितले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात ही बैठक होती. या बैठकीला आमदार-खासदार उपस्थित होते, अशी प्रतिक्रिया बबनदादा शिंदे यांनी दिली.
दरम्यान, बबनदादा शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीचे कारण दिले असले तरी सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा सुरु आहे. सोलापुरात राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"