वर्धा: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत मराठ्यांच्या ओबीसीकरणाची भूमिका मांडली. या भूमिकेला विरोध करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राज्यातील विविध ठिकाणी ओबीसी एल्गार मेळावे आयोजित केले जात आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील मेळाव्यानंतर आज वर्धा येथील लोक महाविद्यालयाच्या मैदानावर ओबीसी महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या मेळाव्याकडे ओबीसी बांधवांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं.
ओबीसी मेळाव्याला छगन भुजबळ मार्गदर्शन करणार होते. तसंच मेळाव्यासाठी सकाळी ११ वाजताची वेळ देण्यात आली होती. मात्र उन्हामुळे उपस्थिती फारच कमी असल्याचं दिसलं. सभास्थळावरील बहुतांश खुर्च्या रिकाम्या होत्या. आलेले नागरिकही सावलीचा आधार घेऊन उभे होते. या मेळाव्याला जवळपास २५ हजार लोक उपस्थित राहतील, असा दावा केला जात होता. मात्र प्रत्यक्षात ४०० ते ५०० लोकंच सभास्थळी दाखल झाले होते.
छगन भुजबळ अनुपस्थित, कारणही सांगितलं!
वर्ध्यातील या मेळाव्याला छगन भुजबळ उपस्थित राहिले नाहीत. सकाळपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने भुजबळ या मेळाव्याला येऊ शकले नसल्याचं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं. मात्र सभेला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी जाणं टाळलं का, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहिले नसले तरी खासदार रामदास तडस, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, महादेव जानकर हे उपस्थित होते.