नाशिक: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा (SSC Result 2022) निकाल जाहीर करण्यात आला. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र, दहावीच्या परीक्षेला यशस्वी होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना निराश न होता पुन्हा प्रयत्न करण्याचा सल्ला महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील नेत्यांनी दिला आहे. यातच एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी डिप्रेशन न घेता अभ्यास करण्याचा सल्ला देत, दोन वर्षे मी जेलमध्ये राहून आलो तरी मला कधी डिप्रेशन आले नाही, मग तुम्हाला ऑनलाइन शिक्षणामुळे डिप्रेशन कसे येते, असा मिश्किल सवाल केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरच नाशिकमध्ये उभारले जाणार आहे. आज त्याचा भूमिपूजन सोहळा दिंडोरी तालुक्यातील शिवनई गावात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विद्यार्थी आणि विद्यापीठाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे दहावीच्या निकालाचा दाखला देत, छगन भुजबळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
डिप्रेशन न घेता विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा
दहावीच्या परीक्षेत यशस्वी होता आले नाही किंवा अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नसले तरी कोणत्याही प्रकारचे डिप्रेशन न घेता विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, असे छगन भुजबळ म्हणाले. तसेच २४ जून २०१३ ला उपकेंद्राबाबत निर्णय घेण्यात आला होता. पण नंतर दुसरे सरकार आल्याने ते काम थांबले होते. मात्र, आता आमचे सरकार परत आल्याने हे काम पूर्णत्वास जात आहे, असे भुजबळ यांनी नमूद केले.
दरम्यान, राज्याचा इयत्ता १० वीचा निकाल जाहीर झाला असून दरवर्षी प्रमाणे यंदाची कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागातून सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. उत्तीर्ण मुलींचा ९७.९६ टक्के तर मुलांचा ९६.०६ टक्के निकाल लागला आहे. २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ८,१६९ दिव्यांग विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. राज्यातील २२,९२१ माध्यमिक शाळांतून १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२,२९० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९. २७ अशी सर्वाधिक असून, सर्वांत कमी उत्तीर्णतिची टक्केवारी नाशिक विभागाची ९५.९० अशी आहे.