नाशिक - राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हेदेखील चर्चेत आले आहेत. कारण मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्यास छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे. कुणबी दाखले दिल्यास ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात येईल, असं म्हणत भुजबळांनी सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची मोट बांधत जालन्यातील अंबड येथे आक्रमक सभा घेतली. मात्र छगन भुजबळ हे सत्तेत सामील झाल्याने आता भाजपची स्क्रिप्ट वाचून दोन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या आरोपाला भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
"भुजबळांना कोणी स्क्रिप्ट देऊ शकत नाही, हे आतापर्यंत सगळ्यांना माहीत आहे. मी मागे बोलत होतो तेव्हा ना मला पवारसाहेब देत होते, ना आता शिंदे, फडणवीस किंवा अजितदादा स्क्रिप्ट देतात. मला कोणीही स्क्रिप्ट देत नाही. ३५ वर्षांपासून मी ओबीसींचं काम हातात घेतलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवराय, फुले, शाहू आणि आंबेडकरांचं जे स्क्रिप्ट आहे, जे या देशातील बहुजन समाजाचं स्क्रिप्ट आहे, तेच माझं स्क्रिप्ट आहे," असा पलटवार छगन भुजबळ यांनी आपल्या राजकीय विरोधकांवर केला.
वडेट्टीवारांना काय विनंती केली?
छगन भुजबळ यांनी अंबडमधील सभेत घेतलेली टोकाची भूमिका आम्हाला मान्य नाही, असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यापुढे भुजबळांच्या व्यासपीठावर जाणार नसल्याचं जाहीर केलं. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्याने छगन भुजबळ एकटे पडल्याची चर्चा सुरू झाली होती. याबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले की, "मी अजिबात एकटा पडलेलो नाही. राज्यातील ओबीसी समाज पूर्णपणे माझ्या पाठीशी आहे. काही नेतेमंडळींची अडचण झाली असेल. आता काहीजण म्हणत आहेत की, आम्ही भुजबळांच्या व्यासपीठावर जाणार नाही. ठीक आहे, तुम्ही माझ्या व्यासपीठावर येऊ नका, पण ओबीसींच्या सभा घ्या. ओबीसींचं आरक्षण वाचवणं, ही तुमची आणि माझी सारखीच भूमिका आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या व्यासपीठावर न येता पुढेही हीच भूमिका मांडा. नाहीतरी मी कुठे राज्यभर एकटा जाऊ शकणार आहे. त्यामुळे मी स्वतंत्र सभा घ्या, रॅली काढा. कोणी मला कुठे बोलावलं तर मी जाईल, नाहीतर तुम्ही हे आंदोन चालू ठेवा, अशी माझी या सर्व संबंधितांना विनंती आहे,' असं ते म्हणाले.
दरम्यान, "ओबीसींची मोट विस्कटलेली नाही. काही लोकांची अडचण झाली असेल. पक्षामुळे ही अडचण झाली असेल किंवा इतर कोणत्या लोकांमुळे झाली असेल. पण अंबडच्या सभेत त्यांनी त्यांचं मत जाहीर केलं आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही जा, कोणत्याही पक्षात राहा, फक्त ओबीसींसाठी लढा. माझ्याविरोधात बोललात तरी चालेल, पण ओबीसींच्या बाजूने बोला," असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे.