Maharashtra Politics: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगाव येथे जाहीर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी केवळ भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली नाही तर राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या विधानावरून कानपिचक्याही दिल्या. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही दिला. ठाकरे गटाच्या या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून समर्थन करण्यात आले असून, वीर सावरकरांविषयी महाराष्ट्राला प्रेम, ठाकरे गटाची भूमिका योग्यच आहे, असे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांच्या मालेगाव येथे झालेल्या सभेवर प्रतिक्रिया दिली. मालेगांवची सभा उत्स्फूर्त होती, प्रतिसाद प्रचंड होता, शिंदेंच्या विरोधात लोक बोलत होते. सभा यशस्वी झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी नाशिक आहे. सावरकर यांच्याविषयी प्रेम आहे, सावरकर यांच्यांबाबत बोलू नका हे सांगितले. राहुल गांधी यांना सहज शक्य आहे, दोघांना अडचण होणार नाही. उद्धव यांचे बोलणे चुकीचे नाही, महाशक्ती विरोधात लढताना छोट्या गोष्टी टाळल्या, तर मोठा जनसमुदाय आपल्यासोबत येऊ शकतो. एकत्र लढूया, लोकशाही अस्ताला जात असल्याने देशभरात लढू, राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई चुकीचे आहे. प्रत्येकाचे तोंड कुठल्या ना कुठल्या प्रकारे बंद करण्याचे काम सुरू आहे, कुटुंबियांना त्रास देतात, याला लोकशाही कशी म्हणणार, असा सवाल भुजबळ यांनी केला.
महाशक्ती असल्याने त्यांनी आव्हान स्वीकारले पाहिजे
उद्धव ठाकरे हे उद्धव ठाकरे आहेत. महाविकास आघाडीच्या सभा होत आहेत, लोकशाही विरोधात काम चालू आहे. सत्तेतील लोकांना बाहेर काढावे, यासाठी सभा होणार असून निवडणूक जवळ येत आहेत, राहिलेले दीड वर्ष निघून जाईल, उद्या निवडणूक घ्या, आम्ही तयार आहोत, त्यांच्या मागे महाशक्ती असल्याने त्यांनी आव्हान स्वीकारले पाहिजे, असे भुजबळ यांनी सांगितले.
दरम्यान, शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की, सुहास कांदे यांच्यावर चर्चा करणार नाही. सुहास कांदे माझ्यासाठी पक्ष सोडल्याचे सांगतात, यात माझा काय सबंध आहे. कांदे यांनी माझ्यासाठी सोडला, मग बाकीच्यांनी कोणासाठी सोडला? हे ४० लोक गेले, संपूर्ण देशाला माहिती आहेत, असा पलटवार भुजबळ यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"