NCP Ajit Pawar ( Marathi News ) : विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने आमदार आणि इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून पक्षांतराचे प्रमाणही वाढले आहे. अशातच काँग्रेसचे चार आमदार येत्या काही दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षात प्रवेश करतील असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे की, "काल अभिनेते सयाजी शिंदे यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला. येत्या काही दिवसांत काँग्रेस आमदार सुलभा खोडके या आमच्या पक्षात प्रवेश करतील आणि त्यानंतर काँग्रेसचे अन्य तीन आमदार आमच्याकडे येतील. तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही अनेक नेते असल्याने तेथील काही नाराज झालेले नेते आमच्या पक्षात प्रवेश करतील," असं मिटकरी यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, अमोल मिटकरी यांचा दावा खरा ठरतो का आणि काँग्रेसचे आमदार खरोखरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काँग्रेसच्या महिला आमदारावर कारवाई!
काँग्रेसच्या अमरावती विधानसभा मतदारसंघातील आमदार सुलभा खोडके यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. सुलभा खोडके यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांचं पक्षामधून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिलेल्या सूचनेनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही कारवाई केली आहे.
मागच्या काही काळापासून सुलभा खोडके या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. तसेच काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांमध्ये सुलभा खोडके यांचाही समावेश असल्याचा दावा केला जात होता. त्यातच नुकतीच त्यांनी अमरावतीमध्ये जोरदार बॅनरबाजीही केली होती. त्यानंतर आता सुलभा खोडके यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.