मुंबई : औरंगाबादमध्ये 1 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेपूर्वी औरंगाबादेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षा व्यवस्थेसाठी काही मदत लागली तर निश्चिंतपणे सांगा, असे आवाहन केले. तसेच, पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना सभेआधी इफ्तार पार्टीला येण्याचे निमंत्रण दिले आहे.
यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी इम्तियाज जलील आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यासंदर्भात क्लाईड क्रास्टो यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, "औरंगाबादमधील भाजपच्या 'B' टीमच्या नेत्याने इफतारसाठी भाजपच्या 'C' टीमच्या नेत्याला आमंत्रित केले आहे, हे जाणून बरे वाटले. यामुळे देशभरात नक्कीच चांगला संदेश जाईल आणि या दोन्ही टीमला त्यांच्या कर्णधारांबद्दलच्या भावना उघडपणे व्यक्त करण्यास मदत होईल."
राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचे निमंत्रण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेबद्दल बोलताना इम्तियाज जलील म्हणाले आहेत की, ''राज ठाकरे औरंगाबादेत येणार आहेत, त्यांची सभा आहे. मला त्यांना इतकंच म्हणायचे आहे की 1 तारखेला तुमची सभा आहे. तुमची ही सभा रात्री 8 किंवा 8.30 वाजता सुरु होईल, त्याआधी तुम्ही आमच्यासोबत इफ्तार करण्यासाठी यावे, सर्व हिंदू-मुस्लिम भाऊ एकसोबत बसून इफ्तार केल्यास समाजात एक चांगला संदेश जाईल.'' तसेच, इफ्तार निमंत्रण त्यांना माध्यमातून आम्ही दिले आहे, ही आमची संस्कृती आहे, ते आपले पाहुणे आहेत. आम्ही पोलिसांना सांगितले काही मदत लागत असेल तर आम्ही करू, मी स्वतः दिवाळी फराळला जातो. तर राज ठाकरे यांनी इफ्तारला यायला हरकत नाही, असेही इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंच्या सभेला परवानगी, मनसेत उत्साहाचे वातावरणगेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसेने आक्रमक पवित्र घेतला आहे. मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी मनसेने राज्य सरकारला 3 मेचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे सध्या राज्यात हिंदुत्वाच्या मुद्यावरून राजकारण तापले असून दररोज काही न काही राजकीय वाद निर्माण होत आहे. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला पोलिसांकडून परवानगी मिळाली आहे. ही परवानगी देत असताना राज ठाकरे यांना पोलीस प्रशासनाकडून 16 अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींचे पालन करून 1 मे रोजी राज ठाकरे यांना आता आपले विचार व्यक्त करता येणार आहेत. ही परवानगी मिळाल्यामुळे मनसेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.