मनसेच्या पाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भाषणाचे पडसाद अद्यापही दिसत आहेत. या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर काहींनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले, तर काहींनी आक्षेपही घेतला. राज्यातील काही राजकीय पक्षांचे नेतेही त्यांच्या या भूमीकेवर टीका करताना दिसून आले. मनसेतीलही काही कार्यकर्ते नाराज झाले. यानंतर आता पुन्हा 12 एप्रिलला ठाण्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. त्यांच्या या सभेला 'उत्तर सभा', असे नाव देण्यात आले असून याचा एक टीझरही मनसेकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. याच टिझरवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांच्या आगामी सभेच्या टिझरवरून मनसेवर निशाणा साधताना कास्टो यांनी, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या, "हिंदी ही राजभाषा असून देशाच्या एकात्मतेचा एक महत्त्वाचा भाग बनवण्याची वेळ आली आहे. स्थानिक भाषेतील राज्यांनी इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदीचा स्वीकार करायला हवा," या वक्तव्याचा धागा पकडला आहे.
क्लाईड क्रास्टो म्हणाले, "भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, "हिंदी को इंग्लिश के एक विकल्प के तौर पर लिया जाना चाहिए." मनसेने एक पाऊल पुढे टाकून आदरपूर्वक आपली मातृभाषा सोडून हिंदीमध्ये 'टीझर' काढला. आता पुढचे भाषण पण यांचे नेते हिंदी मध्ये करणार काय?"
काय आहे टीझरमध्ये -राज ठाकरेंच्या सभेचा हा टीझर मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या सभेमधे राज ठाकरेंच्या भाषणावर राजकीय प्रतिक्रियांना या सभेतून उत्तर दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मनसे नेते संदिप देशपांडे यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांनी केलेल्या टीका आहेत. या सर्व टीकांवर राज ठाकरे ठाण्याच्या सभेत उत्तर देणार आहे. या सर्व टीकांना राज ठाकरे करारा जवाब देणार असे म्हटले आहे.