Jay Ajit Pawar: काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसोबत पक्षात मोठी बंडखोरी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यामुळे राजकारणात मोठा भुकंप झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अर्थ खात्याचा कार्यभारही अजित पवारांकडे देण्यात आला. अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावरही दावा केला असून, यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच निकाल देण्याची शक्यता आहे. आताच्या घडीला अजित पवार राज्यातील अनेक ठिकाणी दौरे करत असून, पक्ष बांधणीवर भर देत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार राजकारणात सक्रीय होऊ शकतात, असे स्पष्ट संकेत मिळत असल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवारांचे ज्येष्ठ सुपुत्र पार्थ पवार राजकारणात आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारांनी नशीब आजमावले होते. मात्र, त्यांना यश आले नाही. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पार्थ पवार अधिक सक्रीय दिसले नाहीत. मात्र, अजित पवारांच्या बंडखोरीनंतर आता पार्थ पवार पुन्हा एकदा सक्रीय होत असल्याचे दिसत आहे. पार्थ पवार यांच्यानंतर आता अजितदादांचे धाकटे पुत्र राजकारणात सक्रीय होत असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
बारामतीची सूत्र हातात घ्या, जय पवारांना कार्यकर्त्यांचे आवाहन
अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. बारामतीमध्ये अजित पवारांचा रोड शो झाला. यावेळी अजित पवार यांचे दोन्ही सुपुत्र सक्रीय झाल्याचे दिसले. यावेळी जय पवार यांना कार्यकर्त्यांनी गराडा घातला होता. तुम्ही बारामतीची सूत्र हातात घ्या. अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे, असे म्हणत त्यांनी जय पवार यांना बारामतीच्या राजकारणात सक्रिय होण्याचे आवाहन केले. जय पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तुम्ही अजितदादांशी बोलून घ्या, त्यांनी मला ग्रीन सिग्नल दिला की मी लगेच तयारीला लागतो, असे जय पवार यांनी म्हटल्याचे सांगितले जाते. आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या सोबतीला पार्थ पवार आणि जय पवार सक्रीय राजकारणात दिसू शकतात. यामुळे अजित पवार यांची आणखी ताकद वाढेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, आताच्या घडीला पवार कुटुंबातील शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार राजकारणात सक्रीय असून, यात आता जय पवार यांचे नाव जोडले जाण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.