शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्य़ास तयार आहे. परंतु आमदारांनी २४ तासांत मुंबईत परत यावे, तिथे बसून पत्रे पाठवत बसू नये, असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. दरम्यान, यानंतर महाविकास आघाडीतील अन्य पक्षांकडूनही प्रतिक्रिया आली होती. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“सरकार टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे त्यामुळे संजय राऊत यांनी जे वक्तव्य केले त्यावर आम्हाला टीका करायची नाही,” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर वक्तव्य केलं. दरम्यान, आघाडीतील मित्रपक्ष काही विधानं करत आहेत. मात्र अडीच वर्षांमध्ये निधीत कधीही काटछाट केली नाही. सगळा निधी दिला आहे. मी दुजाभाव केलेला नाही. सर्वांना मदत करण्याची भूमिका असते. लोकांचे प्रश्न सोडवत असतो असंही त्यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरेंना पूर्ण पाठिंबामहाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांना पूर्ण पाठिंबा देऊन आघाडी सरकार टिकण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा असून यासंदर्भात काल आणि आज बोललो आहे त्यामुळे यापेक्षा राष्ट्रवादीची वेगळी भूमिका नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.