"मग तुरूंगात चक्की पिसिंग पिसिंग अँड पिसिंग..."; ‘अजितदादां’ची बारामतीत जोरदार फटकेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 05:44 PM2021-01-31T17:44:56+5:302021-01-31T17:46:14+5:30
विरोधकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलेली फटकेबाजी हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली.
बारामती : मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रमात उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. रविवारी (दि३१) दिवसभर बारामतीत पवार यांनी विरोधकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलेली फटकेबाजी हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली. बारामती येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.
"व्यवसाय निवडताना अवैध उद्योग करण्याचे पाप कोणी करणार नाही याची खात्री बाळगतो. या योजनेचा लाभ घेताना मध्यस्थ, दलालाची गरज नाही. काहीजण माझ्याबरोबर फोटो काढत कालच दादांना भेटुन आलोय, चल तुझ काम करतो असे सांगतात. हे प्रकार चालणार नाहीत. पैशाची मागणी केल्यास पोलीसांकडे तक्रार करा, मला सांगा. मी बघतो काय करायचे त्यांचे. कार्यकर्त्यांनी कोणाकडूनही पैसे मागू नये. अन्यथा जेलमध्ये जावे लागेल. त्यानंतर मग जेलमध्ये चक्की पिसिंग पिसिंग अॅण्ड पिसिंग करावे लागेल," असं मिश्किल वक्तव्य अजित पवार यांनी यावेळी केलं.
यावेळी पवार यांनी भल्या पहाटेच काम करण्याच्या पद्धतीबाबत भाष्य केलं. "पवार कुटुंबीयांवर बारामतीकर जीवापाड प्रेम करत असल्याने जेवढी कामे करावी तेवढी कमीच वाटतात. विकासकामे जागेवर जाऊन पहावी लागतात. त्यासाठी थोड उजाडल्यावर दिसण्याची वाट पहावी लागते. अन्यथा मी रात्रीही काम केल असतं," असं पवार यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
कामाच्या दर्जाबाबत अजित पवार आग्रही असतात. आज देखील पवार यांनी बारामती येथील निरा डावा कालव्यावर काम न आवडल्याने संबंधितांना चांगलच झापल्याचे यावेळी कार्यक्रमात सांगितले. जनतेचा पैसा आहे, त्याचा योग्य वापर झाला पाहिजे असं म्हणत निरा डावा कालव्याच्या कामाला विरोध करणाऱ्या विरोधकांना पवार यांनी चिमटे काढले.पवार म्हणाले. "शहरात मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र, कालव्याच्या काँक्रिटीकरणामुळे अनेकांचे पाणी जाईल अशी ओरड काही करीत आहेत. हा केवळ विरोधासाठी विरोध आहे. कारण नसताना, चांगल चाललेलं असताना काम काहीजण उगाच काही गोष्टी करत आहेत. ही जित्रब वाईट आहेत. बारामतीकर यांचा विचार करीत नाहीत ही गोष्ट खरी आहे. बाहेरचा कोणी आला तर त्याचे डिपॉझिट जप्त करुनच त्याला पाठवतात, असे बारामतीकरांचे काम आहे. त्यामुळे बारामतीकरांसाठी आणखी काम करण्याची इच्छा निर्माण होते," असंही त्यांनी नमूद केलं.
कामाचा उत्साह वाढतोय
"शरद पवार हे वयाच्या ऐंशीव्या वर्षी कार्यरत आहेत. सुप्रिया सुळेदेखील पन्नाशीला पोहचल्या आहेत. मी पण साठी ओलांडली. मात्र, वय वाढल्याचे कळेना. वय वाढतेय तसा दिवसेंदिवस उत्साह वाढतोय हे सांगताना कामाचा उत्साह वाढतोय, दुसरे काही नाही," असे पवार मिश्किलपणे म्हणाले.