राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री परळीच्या दिशेनं परतताना हा अपघात झाला. यामध्ये धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागल्याची माहितीही मिळाली आहे. यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
“मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना, रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये,” असं धनजंय मुंडे म्हणाले. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
शालेय शिक्षणमंत्र्यांकडे मागणीराज्यात पहिली ते चौथीत शिकणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती आदी प्रवर्गातील सावित्रीच्या लेकींना मागील ३० वर्षांपासून नियमित शाळेत येण्यासाठी दिले जाणारे दैनंदिन १ रुपया प्रोत्साहनपर अनुदान वाढवून प्रतिदिन किमान २० रुपये करावे, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे एका पत्राद्वारे मंगळवारी केली होती.