Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्न दिवसेंदिवस चिघळत असून, शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याप्रकरणी अमित शाह यांची भेट घेतली. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अमित शाहांशी चर्चा केल्याचे सांगितले. यावर आता राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली असून, केंद्र सरकारने तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
खरे तर केंद्र सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घातले पाहिजे. हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना कर्नाटक सरकारकडून अशा प्रकारची अतिरेकी भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कर्नाटक सरकारला योग्य ती समज दिली पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक भूमिका घेत असताना, महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या वतीने सरकारने योग्य ती भूमिका स्पष्टपणे मांडली पाहिजे, अशी प्रत्येक मराठी माणसाची अपेक्षा आहे, असे दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली अमित शाहांची भेट
महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, छत्रपती शिवाजी महाराज अवमान यासह शिंदे फडणवीस सरकारमधील वाचाळवीरांबाबत तक्रार केली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. आम्ही ज्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या आहेत, त्या अतिशय संवेदनशीलपणे आणि राजकारण बाजूला ठेवून त्यांनी त्यामधून मार्ग काढावा, अशी विनंती अमित शाहांना केली आहे. यावर, तसेच गुजरात सरकारचा शपथविधी झाल्यानंतर काहीतरी मार्ग काढतील, असा शब्द त्यांनी दिला आहे. त्यामुळे यात केंद्राचा हस्तक्षेप होईल, असा मला विश्वास आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपली आडमुठी भूमिका कायम ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांशी बोलणे झाले आहे. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. तसेच, याप्रकरणात कोणतीही तडजोड करणार नाही. अमित शाहांबरोबर सीमाप्रश्नावरून कोणतीही चर्चा झाली नाही, असे बोम्मईंनी स्पष्ट शब्दांत सांगितले. जेपी नड्डा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून शांतता राखण्यास सांगितले आहे, असेही ते म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"