Maharashtra Politics: अलीकडेच झालेल्या विधानसभा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मतदारसंघातही भाजपचा पराभव झाला. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
मीडियाशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, सर्वे झूठ है तो अभी जो निकाल हात में आया वो क्या है? असा सवाल करत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालावरून जनमत सरकारविरोधी आहे हे स्पष्ट होते, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले. एकनाथ खडसे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.
साधा नागपूरचा आमदार तरी निवडून आणून दाखवावा
जनतेने फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवला नाही. नागपूरची जागा मुद्दाम मतदारांनी पाडली. कारण पदवीधरांचा फडणवीस यांच्यावर विश्वास नव्हता. फडणवीस, गडकरी यांच्या बालेकिल्ल्यात विशेषत: संघाच्या बालेकिल्ल्यात भाजपने सपाटून मार खाल्ला आहे. खडसे त्यांच्या गावात एक सरपंच निवडून आणू शकत नाहीत, असं मला म्हणत होते. आता माझा फडणवीस यांना सवाल आहे. त्यांनी साधा नागपूरचा आमदार तरी निवडून आणून दाखवावा, असे आव्हान एकनाथ खडसे यांनी केले.
दरम्यान, या पुढचे भविष्य महाविकास आघाडीचे आहे, असा दावा करत, महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध नाही. हजारो लोक बेरोजगार आहेत. शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हजारो शेतकरी कापसाच्या भावासाठी वणवण भटकत आहेत. लाखो शेतकरी या सरकारच्या अपेक्षेवर आहेत, असे सांगत एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"