Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसून येत आहे. सीमाप्रश्नाचे पडसाद लोकसभेतही उमटल्याचे पाहायला मिळाले. यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. हल्ले थांबले नाहीत तर आमचाही संयम सुटेल. हे प्रकरण येत्या ४८ तासांत संपले नाही, तर मला बेळगावात जावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला होता. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, शरद पवारकर्नाटकात गेले तर आम्हीही लाखोंच्या संख्येने जाऊ आणि बसवराज बोम्मई यांना माफी मागायला भाग पाडू, असा इशारा देण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमावादाचा प्रश्न आता शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वाहनांची कर्नाटकमध्ये तोडफोड करण्यात आली, असे खडसे यांनी म्हटले आहे. कन्नडिगांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वाद उफाळून आणला असल्याने दोन्ही राज्यातील सामाजिक वातावरण बिघडले, असा आरोपही खडसे यांनी केला.
केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज
प्रांतवाद चिघळला असून त्यामध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करत, राज्य सरकारला हा वाद राजकारणासाठी चालू ठेवायचा आहे. सातत्याने हा वाद वाढला पाहिजे अशा पद्धतीने सीमावाद हातळला जात आहे, असा गंभीर आरोपही एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.
पवार कर्नाटकात गेले तर आम्हीही लाखोंच्या संख्येने जाऊ
महाराष्ट्र इतका कमजोर नाही की आमच्यावर कन्नडिगांनी हल्ला करावा आणि तो आम्ही सहन करावा. जर शरद पवार कर्नाटकमध्ये गेले तर आम्हीही लाखोंच्या संख्येने त्याठिकाणी जाऊ. आंदोलन करू आणि बोमई यांना माफी मागायला भाग पाडू, अशा इशारा एकनाथ खडसे यांनी यावेळी बोलताना दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"