Maharashtra Winter Session 2022: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अनेकविध मुद्दे गाजताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचे नेते सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी पक्षाकडूनही विरोधकांना प्रत्युत्तर दिले जात आहे. यातच वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांच्या भीष्म प्रतिज्ञेचे काय झाले, अशी विचारणाही खडसे यांनी केली.
विधान परिषदेत वेगळ्या विदर्भाचा मुद्दा चांगलाच गाजला. एकनाथ खडसे यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच घेरले. वेगळा विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्नच करणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या या प्रतिज्ञेचे काय झाले? वेगळा विदर्भ झाला का? वेगळ्या विदर्भाचे काय झाले? शब्द दिला तर तो पाळायचा ना? असा प्रश्नांचा भडिमारच एकनाथ खडसे यांनी केला.
विदर्भ राज्य वेगळा व्हावा ही त्यांची आधीपासूनची भूमिका
देवेंद्र फडणवीस पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. आता उपमुख्यमंत्री आहेत. ते विदर्भातील आहेत. विदर्भ राज्य वेगळा व्हावा ही त्यांची आधीपासूनची भूमिका होती. जोपर्यंत विदर्भ राज्य वेगळं होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. आता लग्न झाले. मुलगी झाली. मुलगी मोठीही झाली. आनंदाने सुखाचा संसार आहे. त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. पण सरकार आणण्यासाठी विदर्भातील लोकांना फसवण्याचे आणि भ्रम निर्माण करण्याचे काम का केले? असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विदर्भातील अनुशेष दूर करण्यासाठी तुम्ही काय तरतूद केली का? अर्थ मंत्र्यांनी सांगावे. अर्थमंत्री म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या नाहीत का? वित्तीय शिस्त का पाळत नाही? राज्याची वित्तीय तूट वाढत आहे, अशी टीका खडसे यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"