जळगाव - भाजपामधील अंतर्गत वादाला कंटाळून पक्षातून बाहेर पडलेले एकनाथ खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अलीकडेच खडसे अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले होते परंतु शाह यांच्याशी भेट झाली नाही मात्र फोनवरून दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खडसे पुन्हा भाजपात जाणार असल्याचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
याबाबत भाजपा खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, एकनाथ खडसे आणि मी अमित शाह यांच्या भेटीसाठी गेलो होतो परंतु शाह त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे भेटू शकले नाहीत. मात्र फोनवरून चर्चा झाली आहे. चर्चा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यामुळे मी त्यावर बोलू इच्छित नाही. ज्यांना राजकारण करायचं असेल ते करणारच आहेत. मात्र नाथाभाऊ भाजपात येणार आहेत असं मला माहिती नाही. मी भाजपात आहे आणि नाथाभाऊ राष्ट्रवादीत आहेत असं त्यांनी सांगितले.
भाजपा प्रवेशाचं एकनाथ खडसेंकडून खंडनपंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शाह यांना भेटू नये हे नियम आहेत का? मोदी-शाह यांच्यासोबत विरोधक गोधडीत असल्यापासून माझे संबंध आहेत. मी अमित शाह यांना याआधीही भेटलो. यापुढेही भेटणार आहे. देवेंद्र फडणवीसांनाही भेटणार आहे. म्हणून त्याचा दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही असं सांगत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चेचं खंडन केले आहे.
कोण आहेत एकनाथ खडसे? एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १ वर्षापूर्वी खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. एकनाथ खडसे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते होते. विरोधी पक्षनेतेपदापासून महसूल मंत्री असा त्यांना प्रवास आहे. मुख्यमंत्रिपदापासाठी एकनाथ खडसेंचे नाव चर्चेत होते. परंतु ऐनवेळी भाजपा पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांना संधी दिली. त्यानंतर हळूहळू एकनाथ खडसेंचे वर्चस्व पक्षात कमी होऊ लागलं. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे खडसेंनी भाजपाला रामराम करत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.