आज महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्तीची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. यावेळी उपस्थित अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते.
दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच त्यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही आपल्या भावनांना वाट करून दिली. सुख थोडं, दुःख भारी दुनिया ही भली बुरी, घाव बसल घावावरी सोसायाला झुंजायाला, अंगी बळ येऊं दे, आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे,” असं ट्वीट त्यांनी केलंय. “आपण सर्वाचे अश्रू आणि भावनाही पाहत आहात. गेली ६० वर्षे कार्यकर्त्याच्या मनात काय, हे बघणारे जादूगर आहात. वय हा तुमच्यासाठी प्रश्न नाही आहे. २००४ साली नागपूरमध्ये तोंडातून रक्त वाहत असताना प्रचार करताना पाहिलं आहे. आताची तब्येत खूप बरी आहे. अशा अवस्थेत तुम्ही पक्ष सावरला,” असंही ते म्हणाले होते.
“तुमच्यासारखा पुरोगामी माणूस महाराष्ट्रात होणे नाही. आमचं जीवनच तुम्ही आहात. एवढ्या अडचणी असताना कोणाकडं जायचं?,” असं म्हणत जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर झाले होते.
काय म्हणाले पवार?“प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्रानं व आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिलं, हे मी विसरू शकत नाही. पण, यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणं आवश्यक वाटतं. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठीत करावी असे मी सुचवू इच्छितो,” असं शरद पवारांनी नमूद केलं.