नवी मुंबई: शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात जाण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. यानंतर गणेश नाईक बुधवारी (३१ जुलैला) सकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी शक्यता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सर्व नगरसेवकांसह गणेश नाईक, संजीव नाईक व आमदार संदीप नाईक बुधवारी भाजपामध्ये जातील असे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर आमदार संदीप नाईक यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. नगरसेवकांनी बैठकीमध्ये काय निर्णय घेतला याची माहिती घेतली जात असून त्यानंतरच योग्य ते पाऊल उचलण्यात येईल, असे स्पष्ट केले. सीबीडी बेलापूरमधील पारसिक हिलवर असलेल्या महापौर बंगल्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीपासून गणेश नाईकांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरण्यास सुरुवात केली होती. दोन दिवसांपासून नाईकांच्या पक्षांतराची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे महापौर बंगल्यावरील बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते. बैठक सुरू होण्यापूर्वी जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी एकही नगरसेवक पक्षांतर करणार नाही, असे स्पष्ट केले होते. परंतु प्रत्यक्ष बैठकीमध्ये सर्वच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची आग्रही भूमिका मांडली. शहराच्या विकासासाठी प्रवाहाबरोबर जाणे आवश्यक असल्याचा सूर सर्व नगरसेवकांनी आळवला. शहराचा विकास करताना महापालिका अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेत असते. पण यामधील काही निर्णयांना राज्य शासनाकडून मंजुरी मिळत नाही. काही निर्णय वेळेत होत नाहीत. यामुळे शहराचा विकास अपेक्षित गतीने होत नाही. शहराचा विकास करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी भूमिका नगरसेवकांनी मांडली.बैठकीपूर्वी कोणीही पक्षांतर करणार नाही, असे सांगणारे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी बैठकीनंतर नगरसेवकांनी पक्षांतराची भूमिका मांडली असल्याचे मान्य केले. सर्वांनीच एकमुखाने प्रवाहाबरोबर जाण्याची मागणी केली असून या भावना गणेश नाईक यांच्यापर्यंत पोहोचवणार असून त्यांच्याकडे पक्षांतरासाठी आग्रह केला जाणार असल्याचे सुतार यांनी सांगितले. या प्रकरणी अंतिम निर्णय त्यांचाच असेल असेदेखील सुतार यांनी स्पष्ट केले. या बैठकीनंतर नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खिंडार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
घड्याळ सोडणार, कमळ धरणार?; गणेश नाईक बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 6:36 PM