Hasan Mushrif ED Raid:राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने छापेमारी केली. मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील निवासस्थांसह त्यांच्या मुलांच्या आणि मुलीच्या घरावरही ईडीने छापेमारी केली. माजी नगराध्यक्ष व मुश्रीफ यांचे उजवे हात समजले जाणारे प्रकाश गाडेकर यांच्या घरीही छापा पडला आहे. या घटनेमुळे कोल्हापूर खळबळ उडाली. यातच ईडीने केलेल्या कारवाईनंतर हसन मुश्रीफ भाजमध्ये जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
ईडीच्या कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ईडीने माझ्या निवासस्थानी, मुलांच्या आणि मुलीच्या घरावर, मुलांच्या कारखान्यावर छापे टाकले. पुण्यातही काही व्यक्तींच्या घरावर ईडीने छापेमारी केली. ही कारवाई करण्याआधी ईडीने मला कोणत्याही प्रकारची नोटीस अथव समन्स बजावला नव्हता. संबंधित कारखान्याशी माझा काहीही संबंध नाही. या कारखान्यावर चार वर्षांपूर्वी प्राप्तीकर विभागाने छापे टाकले. तपासण्या झाल्या. तसेच किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर मी तीनवेळा पत्रकार परिषद घेऊन उत्तरे दिली आहे, असे स्पष्टीकरण हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना दिले.
ईडी कारवाईनंतर आता भाजपमध्ये जाणार का?
मीडियाशी बोलताना, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत दिलेल्या ऑफरबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर, हसन मुश्रीफ यांनी हसत-हसत उत्तर देण्याचे टाळले. मात्र, पुन्हा तोच प्रश्न करण्यात आला. तेव्हा मुश्रीफ यांनी ‘असे कसे होईल’, असे सांगत प्रश्नावर अधिक बोलणे टाळले. चंद्रकांत पाटलांच्या ऑफरबाबत मुश्रीफ यांनी कोणतीही भूमिका स्पष्टपणे मांडली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर खुलासा केल्यानंतरही किरीट सोमय्यांनी नव्याने माझ्यावर तेच आरोप केले. त्यामुळे त्यांच्या विरोधात दीड कोटींचा मानहानीचा दावा ठोकण्यात आला आहे. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली. दुसरीकडे, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांविरुद्ध वारंवार तक्रारी केल्या आहेत. त्यातूनच ही कारवाई झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"