ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी राजीव सातव यांनी केली होती कोरोनावर मात. त्यानंतर त्यांना 'सायटोमेगँलोव्हायरस' या नव्या विषाणूची लागण झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी सांगितलं होतं.
काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर, डॉक्टरांनी त्वरीत औषधोपचार सुरू केले. शनिवारी दिवसभरात सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोरोनानंतर आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती. पण, सातव यांना 'सायटोमेगँलोव्हायरस' या नव्या विषाणूची लागण झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारीच सांगितले होते. दरम्यान, यानंतर जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
"सकाळी सकाळीच राजीव सातव यांच्या निधनाची आलेली बातमी दुःखद आहे. आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा जबरदस्त प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला. गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी अत्यंत नेत्रदीपक असं काम केलं. काँग्रेसचे भविष्यातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. सातव यांचं निधन ही काँग्रेसची मोठी हानी आहे. सातव परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली," असं म्हणत जयंत पाटील यांनी दु:ख व्यक्त केलं. गेल्या १५ दिवसांपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. औषधांना ते योग्य प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सत्यपालसिंग यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे चांगली सुधारणा होत होती. ते आता धोक्याबाहेर असल्याचे बोलले जात होते. असं असताना शुक्रवारी रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यानंत, रविवारी पहाटे त्यांचं निधन झालं. काँग्रसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिलं आहे. मनाला वेदना देणारी बातमी : अशोक चव्हाण"काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राजीव सातव यांचे निधन झाल्याची वार्ता आज सकाळीच सर्वांना कळाली. अतिशय धक्कादायक आणि निराश करणारी ही बातमी आज आलेली आहे. अतिशय वेदना देणारी आणि मनाला न पटणारी अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे राजीव सातव धडाडीचे नेते होते. अतिशय अल्प काळामध्ये त्यांनी जिल्ह्यापासून ते थेट राष्ट्रीय पातळीपर्यंत आपल्या कर्तुत्वाने त्या ठिकाणी आपली उंची वाढवली. काँग्रेस पक्षामध्ये अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने काम करणारा असा हा सहकारी आज आमच्यामधून गेल्याची खंत आम्हा सर्वांना आहे," असं म्हणत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दु:ख व्यक्त केलं.