Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. यातच आता भाजप निवडणूक घेण्यासाठी घाबरलेला आहे. महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले होते. कांद्याला हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांनी यावेळी कांद्याच्या माळा गळ्यात घातल्या होत्या. कांदा उत्पादकांना दर मिळत नसल्याने ते नाराज आहेत. कांदा उत्पादकांचे अतोनात नुकसान होत आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, कांद्याचे भाव पडले असून शेतकरी उघड्यावर पडला आहे. राज्य सरकारकडे आम्ही छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात मागणी केली. मात्र सरकारने थातूरमातूर उत्तरे दिली. सरकारने समिती नेमण्याचा आश्वासन दिले. समिती नेमेपर्यंत लहान शेतकरी कांदा विकेल. कारण त्याला पर्याय नसतो. हा कांदा व्यापाऱ्यांकडे जाईल. व्यापाऱ्यांचा हित संवर्धन करण्याचे काम भाजपचे सरकार करत असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.
महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळेल
एकत्र लढलो तर फार मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला यश येईल, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच आकड्यात सांगता येणार नाही. मात्र मेजॉरिटी ही महाविकास आघाडीची असेल, असा विश्वास व्यक्त करताना, भाजप निवडणूक घेण्यासाठी घाबरलेला आहे. कारण त्यांच्या लक्षात आले की शिंदे गटाबरोबर जी युती केली आहे ही महाराष्ट्राला रुचलेली नाही. त्यामुळे शक्यतो निवडणुका पुढे ढकलण्याचा काम चालू आहे, या शब्दांत जयंत पाटील यांनी निशाणा साधला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"